जेवन बनविण्याच्या कारणावरून एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:34+5:302021-05-03T04:13:34+5:30
अकोट : सातपुड्यावच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्री खुर्द शिवारात जेवण बनविण्याच्या कारणावरून मध्यरात्री एकाची हत्या केल्याची घटना दि. २ मे ...
अकोट : सातपुड्यावच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्री खुर्द शिवारात जेवण बनविण्याच्या कारणावरून मध्यरात्री एकाची हत्या केल्याची घटना दि. २ मे रोजी उघडकीस आली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील गजानन बोदडे यांच्या शेतात संत्रा झाडांची खोड काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील गिरगोटी गावातील छबुलाल भुसुम, प्रभू राजाराम धीकार व रतीराम राजाराम दारशिंबे हे तीन मजूर कामाला आले होते. मजुरांनी दिवसभर काम करून रात्री दारूची नशा केली. त्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास स्वयंपाक कोण करेल, यावरून शेतातच वाद सुरू झाला. यावेळी प्रभू राजाराम धीकार याने रतीराम दारशिंबेला मारहाण केल्याने रतीराम तेथून पळून गेला. त्यानंतर छबुलाल भुसुम यास प्रभू राजाराम धीकार याने कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत छबुलाल भुसूम गंभीर जखमी झाला. तेथेच त्याचा मृत्यू झाल्याने प्रभू धीकार हा पळून गेला. त्यानंतळ सकाळी रतीराम हा शेतातील घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला छबुलाल शुकलाल भुसुम याचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मजूर कंत्राटदार शरिफोद्दीन नशीरोद्दीन (रा. अकोट) याला दिल्यानंतर पोलीस पाटील, रतीराम, शेतमालक व मजूर कंत्राटदार यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रभू धीकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला सोमठाणा येथून अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
--------------------------
अशा ठोकल्या आरोपीला बेड्या...
मध्यरात्री हत्याकांडानंतर आरोपी घटनास्थळावरून जंगलाकडे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आरोपीला पकडणे पोलिसांना अवघड झाले होते. दरम्यान, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा जनसंपर्क कामी आला. आरोपीचे वर्णन देत ठाणेदार व पोलीस पथकाने या भागातील जनतेला सतर्क केले. जनसंपर्कातील एका व्यक्तीने ठाणेदार फड यांना माहिती देत आरोपीचा फोटो पाठवून पडताळणी केली असता, परिसरातील आदिवासी युवकांनी व ग्रामीण पोलिसांनी सोमठाणा येथे घेराव घालून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या.