अकोल्यात वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 04:10 PM2018-03-16T16:10:54+5:302018-03-16T16:10:54+5:30
अकोला: वार्डात लावलेले वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला निखिल अशोक पळसपगार(20 रा. मोठी उमरी) याचा मृत्यू झाला.
अकोला: वार्डात लावलेले वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला निखिल अशोक पळसपगार(20 रा. मोठी उमरी) याचा मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी विक्की संतोष कपले(20 रा.मोठी उमरी) हा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास नेहरू नगरात घडली.
या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. द्वारका नगरी फत्तेपूरवाडीत राहणारा अक्षय प्रदीप देशमुख(23) याच्या तक्रारीनुसार जुना वाद व वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून आरोपी आशिष उर्फ पहेलवान रमेश मोकळकर, रमेश मोकळकर, गणेश समाधान भातुलकर, अंकुश राजेश नेरकर आणि शुभम एकनाथ कोरकणे(सर्व रा. मोठी उमरी) हे नेहरू नगर येथे आले. निखिल पळसपगार, विक्की कपले व काही मित्र जेवण करीत असताना आरोपींनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. आरोपींनी निखिलच्या छातीवर लोखंडी पाईप व धारदार शस्त्राने वार केले. यात तो जागीच ठार झाला. विक्की कपले हा गंभीर जखमी झाला तर इतर मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनास्थळावर सिव्हिल लाईन पोलिसांनी धाव घेतली आणि जखमी विक्की कपले याला सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. काही आरोपींना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले.