मोबाईल घेतल्याच्या संशयावरून घडले जठारपेठेतील युवकाचे हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:45+5:302021-04-05T04:16:45+5:30
तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात नशेत केली मारहाण अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ चौकात एका युवकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण ...
तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नशेत केली मारहाण
अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ चौकात एका युवकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. हे हत्याकांड मोबाईल देवाणघेवाणीच्या कारणावरून झाल्याची माहिती समोर आली आहे. रामदासपेठ पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे.
दिवेकर आखाडा परिसरातील अन्नपूर्णा अपार्टमेंट येथील रहिवासी सौरभ सुळे या युवकाने उमेश सुखदेवे याचा मोबाईल घेतल्याची माहिती उमेशला त्याच्या मित्रांनी दिली. मात्र प्रत्यक्षात सौरभ सुळे या युवकाने कोणाचाही मोबाईल घेतला नव्हता; मात्र शनिवारी नशेत असलेल्या उमेश सुखदेवे याने त्याचा साथीदार सुनील वाडेकर व अमोल वाघमारे तिघेही राहणार लहान उमरी यांना सोबत घेऊन नशेतच सौरभ सुळे या युवकावर हल्ला चढविला. लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केल्याने तसेच पोटात लाथा मारल्यामुळे सौरभ सुळे यांचा फडके हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला असता केवळ मोबाईल घेवाणदेवाणीच्या कारणावरून या तिघांनी सौरभ सुळे यांची हत्या केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रविवारी दुपारी सुनील वाडेकर, उमेश सुखदेवे व अमोल वाघमारे राहणार लहान उमरी यांना रामदासपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास रामदासपेठ पोलिस करीत आहेत. अकोल्यात किरकोळ कारणावरून हत्या होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून संताप याचे मुख्य कारण असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.