मूर्तिजापूर नगरपालिकेची महावितरणशी जुंपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:30 AM2018-03-29T02:30:25+5:302018-03-29T02:30:25+5:30
मूर्तिजापूर: मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था अशी सर्वच कार्यालये इतरांकडे असलेल्या आपल्या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी सध्या पूर्ण शक्तीनिशी धडपडत आहेत. त्यासाठी कुठे प्रेमाने तर कुठे कायदेशीर अधिकारांचा वापर करून जबरीने का होईना कर अथवा थकीत बिलाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वसुलीच्या कारणावरून मूूर्तिजापूर नगरपालिका आणि महावितरण ही दोन्ही कार्यालये आपसात भिडली असल्याचे चित्र २८ मार्च रोजी स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था अशी सर्वच कार्यालये इतरांकडे असलेल्या आपल्या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी सध्या पूर्ण शक्तीनिशी धडपडत आहेत. त्यासाठी कुठे प्रेमाने तर कुठे कायदेशीर अधिकारांचा वापर करून जबरीने का होईना कर अथवा थकीत बिलाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वसुलीच्या कारणावरून मूूर्तिजापूर नगरपालिका आणि महावितरण ही दोन्ही कार्यालये आपसात भिडली असल्याचे चित्र २८ मार्च रोजी स्पष्ट झाले. महावितरणची पथदिव्यांच्या विद्युत बिलाची २९ लाखांची रक्कम न. प. कडे थकीत असून, त्याची मागणी महावितरणने नगरपालिकेला २८ मार्च रोजी नोटीस देऊन केली. विशेष म्हणजे सदर नोटीसमध्ये बिलाची थकीत रक्कम त्वरित भरा अन्यथा शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू, अशी धमकी देण्यात आली. दरम्यान न. प. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी महावितरणकडे नगरपालिकेची थकीत असलेली मालमत्ता कराची ५ लाख रुपयांची रक्कम त्वरित भरा, अन्यथा कार्यालयास सील ठोकू, असा इशारा दिला आहे. महावितरण असो नाही तर मूर्तिजापूर नगरपालिका असो, यापैकी कुणाची रक्कम दुसऱ्याकडे किती जास्त प्रमाणात थकीत आहे, तो मुद्दा महत्त्वाचा नसून, वसुली जास्तीत जास्त व्हावी, हा दोन्ही कार्यालयांचा हेतू असतो. दोन्ही कार्यालये महाराष्टÑ शासनाच्या अखत्यारीत येतात; परंतु नगरपालिकेस अधिकार जास्त आहेत. नगरपालिका करवसुलीसाठी कार्यालयाला सील ठोकणे, मालमत्तेचा लिलाव करणे अशी कारवाई करू शकते. महावितरण कार्यालयास कोणतीही कारवाई करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. कारण विद्युत पुरवठा हा जनतेच्या जीवनाशी निगडित असतो. रस्त्यावरील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी नगरपालिकेस वेठीस धरणे, असा प्रकार होतो.
आमच्या नगरपालिकेने मागील वर्षी वीज बिलादाखल ५५ लाख रुपये महावितरणला दिले. आजही २९ लाख ६० हजारांचा धनादेश लिहून व सही करून तयार आहे. महावितरणच्या अधिकाºयांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या मालमत्ता कराची रक्कम भरून हा धनादेश घेऊन जावा.
- दादाराव डोल्हारकर,
मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर.
नगरपालिकेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आम्हाला वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांची मालमत्ता कराची मागणीही योग्य आहे.
- जोगी, सहायक अभियंता, महावितरण, मूर्तिजापूर