मूर्तिजापूर पंचायत समिती सभापती - उपसभापती पदासाठी होणार रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 04:40 PM2022-10-13T16:40:30+5:302022-10-13T16:40:35+5:30
Murtajapur Panchayat Samiti : निवडणूक १६ रोजी दुपारी पंचायत समिती सभागृहात होऊ घातली आहे.
-संजय उमक
मूर्तिजापूर : पंचायत समिती सभापती - उपसभापती निवडणूक १६ रोजी दुपारी पंचायत समिती सभागृहात होऊ घातली आहे. सभापती - उपसभापतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक घेण्यात येणार आहे; परंतु वंचित कडे व महाविकास आघाडीकडे समान सदस्य संख्या असल्याने या निवडणुकीत कमालीची रस्सीखेच होण्याचे चित्र आहे.
मूर्तिजापूर पंचायत समिती सभापती - उपसभापती पदासाठी अनेक जण दावेदार आहेत, महाविकास आघाडीत ठरल्या प्रमाणे पहिली अडीच वर्षे कॉंग्रेसचा सभापती तर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादी साठी ठरले आहेत व पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा उपसभापती तर उर्वरित अडीच वर्षे कॉंग्रेसचा उपसभापती असेल, सभापतीपद हे कॉंग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीकडे ७ सदस्य आणि वंचित बहूजन आघाडीकडे ७ सदस्य असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडीत कॉंग्रेस ३, शिवसेना २, व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य आहेत. त्यामुळे पहिले अडीच वर्षे सभापती पदाची माळ कॉंग्रेसच्या उर्मिला डाबेराव यांच्या गळ्यात टाकण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीला सभापती पद देण्यात येणार आहे, आरक्षणानुसार सभापती पद अनुसचीत जाती करीता राखीव असल्याने राष्ट्रवादीकडे केवळ एकमेव ददादाराव किर्दक हे सदस्य असल्याने ते सभापती पदासाठी दावेदार आहेत तर उपसभापती कॉंग्रेसचा असणार आहे. त्यासाठी प्रकाश वाणरे आपले भाग्य अजमावणार आहेत. कॉंग्रेस कडे तीन अनुसूचित जातीचे सभासद आहेत तर वंचीतकडे आम्रपाली सचिन तायडे याच एकमेव दावेदार असल्याने वंचितचा सभापती पदाचा उमेदवार ठरला आहे. असे असले तरी दोन्ही कडील संख्याबळ समान असल्याने सभापती - उपसभापतीची निवड ईश्वर चिठ्ठी नेच होणार असल्याचे संकेत आहे.