मूर्तिजापूर आगार कारंजात स्थानांतरित होणार; वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 09:12 PM2017-12-10T21:12:13+5:302017-12-10T21:25:05+5:30
मूर्तिजापूर : गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले, मान्यता नसलेले आगार आता बंद होणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्राने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर (अकोला): गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले, मान्यता नसलेले आगार आता बंद होणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्राने दिली, तसेच मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून ७ जून २0१७ याविषयी पत्र निघाले होते. या पत्रानुसार १ जुलै २0१७ पासून आगार बंदसुद्धा होणार होते; परंतु राजकीय दबावामुळे प्रकरण थंड बस्त्यात ठेवल्या गेले होते. आता पुन्हा हे आगार बंद सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाच्या नावाखाली बंद करून कारंजा येथे स्थानांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरू आहे.
या आगाराचे भूमिपूजन ३१ नोव्हेंबर १९९७ ला तत्कालीन परिवहन मंत्री चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महामंडळाचे त्यावेळीचे अध्यक्ष शिवाजीराव गोताड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर अर्थात ९ मे २00३ रोजी उद्घाटन झाले. १४ वर्षांनंतरसुद्धा मूर्तिजापूर आगार सुविधांबाबत दुर्लक्षितच राहिले आहे. एवढेच नव्हे, तर आगाराला मान्यतासुद्धा मिळाली नव्हती. हाच राज्य परिवहन मंडळाचा रचलेला घाट होता की काय, असा प्रश्न आज निर्माण होत आहे.
आगाराचे सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाच्या गोंडस नावाखाली महामंडळाची बैठक पूर्वीच २ जून २0१७ रोजी झालेली आहे. या बैठकीत मूर्तिजापूर आगार कारंजा आगाराला जोडण्याचा निर्णय झाला आहे. वास्तविक पाहता स्पर्धेच्या युगात आगार वाढविणे अपेक्षित आहे; मात्र एसटी मागे मागे जात आहे, असे महामंडळाच्या निर्णयावरून दिसून येते. याविषयी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मूर्तिजापुरातील आगर हलवल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे यांनी दिला आहे.
मूर्तिजापूर आगार बंद किंवा स्थानांतरित करण्याविषयी वरिष्ठांकडून कुठलेच पत्र मिळालेले नाही. सध्या तरी असा कोणताही प्रयत्न सुरू नाही. कार्यालयीन पत्र मिळाल्याशिवाय काहीही बोलणे योग्य नाही.
- योगेश ठाकरे, प्रभारी, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला.