मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:04 PM2019-11-05T13:04:21+5:302019-11-05T13:04:46+5:30

२१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.

Murtijapur assembly constituency does not count 'turkhed' votes - allegation of VBA | मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुरखेड मतदान केंद्र क्रमांक १९० वरील मतदान न मोजताच निकाल जाहीर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, निकाल रद्द न झाल्यास न्यायालयात याचिका टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत मतमोजणीमध्ये झालेल्या गैरप्रकारासंदर्भात सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पातोडे म्हणाले की, २१ आॅक्टोबर रोजी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील ३८१ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी १ लाख ७४ हजार ७९९ मतदान झाल्याचा आकडा प्रशासनाने दिला होता. त्यामध्ये तुरखेड येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक १९० येथे एकूण २१० म्हणजेच ५२.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट केले होते; परंतु २४ आॅक्टोबर रोजी मत मोजणीमध्ये १ लाख ७४ हजार ५८९ मतांचा आकडा जाहीर करण्यात आला. एकूण झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतदानात २१० मतांची तफावत आहे.
मतमोजणीनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये केंद्र क्रमांक १९० चा ‘फॉर्म क्रमांक १७ सी’ नव्हता, तर मतमोजणीच्या दिवशी तयार करण्यात आलेल्या फॉर्म क्रमांक २० मध्ये तुरखेड येथील मतदान केंद्र क्र. १९० वरील आकडेवारी शून्य दाखविण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. म्हणजेच तुरखेड मतदान केंद्रावर झालेल्या २१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.
मतमोजणीची पूर्ण प्रक्रिया न करताच निकाल जाहीर केल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीचा निकाल रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी. तसेच दोषपूर्ण प्रक्रिया राबविणाºया जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट उपस्थित होते.

‘एसडीओ’ म्हणतात...!
मूर्तिजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सदर आरोप खोडून काढला. ते म्हणाले की, विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्या विजयादरम्यानच्या मतांमध्ये १,९१० मतांचा फरक आहे. तुरखेड येथील मतदान केंद्र क्रमांक १९० मध्ये मतदान पार्टीने सीआरसी केली नाही. तेथील मतदान मशीनमध्ये २६१ मते निघाली. अर्थात तेथे २१0 असे प्रत्यक्ष मतदान झाले आणि मॉकपोलचे ५१ असे एकूण २६१ मतदान करण्यात आले. दोन उमेदवाराच्या १,९१० मतांचा फरक असल्याने त्या केंद्रावरील मतमोजणी करणे आवश्यक नाही, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. जर १००-२०० मतांचा फरक असता तर ती मते ग्राह्य धरल्या गेली असती. २१० मते कुठल्याही उमेदवाराकडे वळविली तरी निकालावर फरक पडणार नाही. आम्ही त्यावेळी जी भूमिका घेतली ती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार घेतली आहे. ज्या मतदान पार्टीने सीआरसी केली नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, या संदर्भात त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

 

Web Title: Murtijapur assembly constituency does not count 'turkhed' votes - allegation of VBA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.