मूर्तिजापूर : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:29 PM2017-10-17T19:29:12+5:302017-10-17T19:31:40+5:30
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : दीपावलीच्या पर्वावर आपल्या गावाकडे परतणार्या चाकरमान्यांसह सासरहून माहेरी जाणार्या नवविवाहिता, विवाहितांसह मामाच्या गावाला जाण्याची ओढ असलेल्या बच्चे कंपनीमुळे बसस्थानके गर्दीने फुलून जातात. एसटी विभागाच्या उत्पन्नातील घट भरून काढण्यास दीपावली सणानिमित्त प्रवास करणार्या प्रवाशांच्या वाढणार्या गर्दीचा मोठा हातभार लागतो. प्रवासी सर्वात पहिली पसंती एसटी प्रवासालाच देतात. त्यामुळे एसटीने आपले स्थान प्रवासी वर्गात टिकवून ठेवले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.
एसटी कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने स्थानिक बसस्थानकावरून सुटणार्या बसफेर्या सकाळपासून बंद होत्या. मूर्तिजापूर येथे मुंबई-हावडा लोहमार्गाचे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे कारंजा, दारव्हा, यवतमाळ, दर्यापूर, अंजनगावसह तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील प्रवाशांची येथे मोठी गर्दी झाली होती. एसटीचा संप असल्याने या प्रवाशांची तारांबळ उडाली व मनस्ताप सहन करावा लागला. खासगी वाहनाने घर गाठण्याकरिता दुप्पट तिकीट द्यावे लागले. संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता. खासगी वाहतूकदारांनी या संधीचा फायदा करून घेतला. कारंजा, दर्यापूर या ठिकाणी जाण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबासह गावाकडे जाणार्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सदर संपामुळे मूर्तिजापूर आगाराच्या ६0 पेक्षा अधिक बसफेर्या रद्द झाल्या. दररोज विविध ठिकाणांवरून येणार्या-जाणार्या २00 पेक्षा अधिक बसफेर्या रद्द झाल्या. दीपावलीच्या सणानिमित्त ग्रामीण भागातून खरेदीकरिता येणारे गावकरी, शाळकरी, विद्यार्थी यांची कुचंबणा झाली. आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एसटी कर्मचार्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे, त्यांच्या समस्यांचा निपटारा झाला पाहिजे; परंतु दीपावली या महत्त्वपूर्ण सणाच्या काळात संप करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न प्रवासी वर्गात चर्चिल्या जात होता.
दिवाळीचा सण गावावरून मुलगा, मुलगी, नातू, भाऊ, बहीण, आत्या, मावशी, काका-काकू अशी नात्यातील माणसे येणार म्हणून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे; परंतु ऐनवेळी एसटीचा बेमुदत संप सुरू झाल्याने सणासाठी नात्यातील माणसे वेळेवर पाोहोचतात की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांचा फायदा होत आहे.
- श्रीकृ ष्ण रा. गवई, प्रवासी, खापरवाडा.