मुर्तीजापूर : प्रखर उन्हात तळीरामांच्या दारुसाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 04:46 PM2020-05-06T16:46:43+5:302020-05-06T16:47:00+5:30
मुर्तीजापूरातील तळीरामांनी लाखो रुपयांची दारु ढोसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- संजय उमक
मूर्तिजापूर : तब्बल दीड महिन्यानंतर बुधवारी दारुची दुकाने उघडल्यानंतर मुर्तीजापूरातील तळीरामांनी दारु दुकानांसमोर प्रखर उन्हातही लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. एकाच दिवसात मुर्तीजापूरातील तळीरामांनी लाखो रुपयांची दारु ढोसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवार ६ मे पासून अटी व शर्तींच्या अधिन राहून दारु दुकान सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले असल्याने तळीरामांनी दारु दुकानावर सकाळपासूनच तडपत्या उन्हात रांगा लावल्या होत्या. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत दारु दुकानांना मद्यविक्रीसिठी परवानगी मिळाली असल्याने वेळ संपण्यापूर्वीच आपल्याला दारु खरेदी करता यावी यादृष्टीने मद्यपींनी शिस्तबद्ध पद्धतीने व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून दोनशे मिटर रांगा लावून दारू खरेदी केली.
तळीरामांनी रणरणत्या उन्हात उभे राहून किमान आठ ते १० दिवस पुरेल येवढा 'स्टॉक' विकत घेतला आहे. तर काहींनी एकाच वेळी १० - १० बाटल्या खरेदी करुन दारु पिण्याचा उच्चांक गाठला आहे. सर्व अटी व नियमाचे पालन करुन तालुक्यातील देशी व विदेशी दारुची दुकाने खुली झाल्याने पट्टीच्या मद्यपींना पर्वणीच असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. संचारबंदी नियमानुसार गुरुवारी शहरातील सर्वच बाजारपेठ बंद राहणार असल्याने बहूतेकांनी दोन दिवसांची सोय करुन घेतली आहे.