Mushtaq ali trophy : अकोल्यातील चार खेळाडूंची विदर्भ क्रिकेट संघात वर्णी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 11:18 AM2020-12-27T11:18:43+5:302020-12-27T11:24:23+5:30
mushtaq ali trophy : दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे आणि मोहित राऊत या चौघांचा समावेश आहे.
अकोला: कोरोनानंतर प्रथमच मुश्तक अली टी-२० स्पर्धेच्या निमित्ताने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इंदूर येथे १० जानेवारीपासून खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट संघाची निवड झाली असून, यामध्ये अकोल्यातील चार खेडाळूंची वर्णी लागली आहे. यामध्ये अकोला क्रिकेट क्लबचे दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे आणि मोहित राऊत या चौघांचा समावेश आहे. दर्शन नळकांडे हा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज आहे. यापूर्वी दर्शनने १६,१९ व २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच १९ वर्षाखालील भारतीय संघाचे इंग्लंड येथे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील दोन वर्षांपासून तो किंग्स एलेवन पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धेचे प्रतिनिधित्व करत आहे. तसेच अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा फलंदाज आहे. यापूर्वी त्यानेदेखील १६,१९ व २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजी व इराणी ट्रॉफी संघाकडूनही त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ वर्षीय स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. आदित्य ठाकरे हा मध्यमगती गोलंदाज असून त्याने यापूर्वी १६, १९ व २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे न्युझिलंड येथे १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचे भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. मोहित राऊत हा डावखुरा फिरकी गोलंदाज असून तो अष्टपैलू खेळाडू आहे. यापूर्वी त्याने २३ वर्षाखालील विदर्भ संघाचे व अमरावती विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विदर्भ संघ हा इलाइट ग्रुप डीमध्ये असून संघाचा सामना राजस्थान, सौराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोवा या संघासाेबत होणार आहे. खेळाडूंच्या निवडीबद्दल अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, विजय देशमुख, कैलास शहा, दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, ॲड. मुन्ना खान, गोपाळ भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, जावेद अली, परिमल कांबळे, रवी ठाकूर यांच्यासह अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेतर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले.