अंध दाम्पत्याला संगीताची साथ अन् स्वाभिमानाचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 02:40 PM2020-02-09T14:40:37+5:302020-02-09T14:40:45+5:30
अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकावर हे दाम्पत्य दररोज बसस्थानकावर जागा मिळेल तेथे भक्तिगीत आणि प्रबोधनाची गीते गात असतात.
अकोला : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या दाम्पत्यांनी हात पसरून भीक न मागता, देव, संत आणि प्रबोधनाची गीते गाऊन त्यांनी रोजगार मिळविला आहे. अकोल्याच्या जेतवन नगरातील या अंध दाम्पत्यांचा अभिनव आदर्श डोळस असलेल्या बेरोजगारांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरतो आहे.
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला संजय वानखडे (५५) आणि त्याची पत्नी (५०) विमल. अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकावर हे दाम्पत्य दररोज बसस्थानकावर जागा मिळेल तेथे भक्तिगीत आणि प्रबोधनाची गीते गात असतात. गीत आवडले तर प्रवासी स्वखुशीने त्यांच्या हाती पाच-दहा रुपये ठेवून जातात. या मिळकतीवर दाम्पत्यांची दिनचर्या चालते. गत ३३ वर्षांपासून ही दाम्पत्य सकाळी बसस्थानकावर येतात अन् सायंकाळी रोजगार मिळवून निघून जातात; पण ते कधीही परिसरात भीक मागत नाही. संगीताची साथसंगत देत प्रवाशांना आनंदित करून स्वाभिमानाने पैसे कमवितात. प्रवाशांना संगीताचा आनंद मिळत असल्याने तेदेखील प्रतिसाद देत स्वखुशीने पाच-दहा रुपये देऊन जातात. स्वाभिमानाचा सूर गवसलेल्या हे दाम्पत्य भीक घेत नाही. कुणी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला थांबवून गीत ऐकविल्याशिवाय ते राहत नाही. एकीकडे तरुण युवक नाउमेद होऊन आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे संजय-विमलसारखे अंध दाम्पत्य डोळस आणि धडधाकटांना जगण्याची उमेद देणारे आदर्श तयार करीत आहे.