माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:21 AM2021-08-29T04:21:05+5:302021-08-29T04:21:05+5:30
तेल्हारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तालुक्यात ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ अभियान सुरू केले असून, ई-पीक ...
तेल्हारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तालुक्यात ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ अभियान सुरू केले असून, ई-पीक पाहणी ॲप्सद्वारे शेतकऱ्यांना स्वतःचा पीक पेरा स्वतःच भरून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यात दि. २३ ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ई-पीक पाहणीबाबत पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
सर्व महसूल व कृषी अधिकारी एक दिवस ई-पीक पाहणी या कामासाठी या दृष्टीने ई-पीक पाहणीबाबतचे काम दि. ३१ ऑगस्ट २०२१ या दिवशी करतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी तालुका कृषी अधिकारी, सर्व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यांमध्ये तलाठी मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांच्यामार्फत गावागावांमध्ये ई-पीक पाहणी ॲप्सबाबत प्रचार व प्रबोधनाचे काम मोहीम सुरू आहे.
----------------------------
पीक पाहणी दावे निकाली निघणार!
ई-पीक पाहणी ॲप्सद्वारे पीक पेऱ्याची माहिती भरल्यास शासनाच्या विविध योजनेसाठी उपयोगी येणार असून, शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे, आदींचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्सचा वापर करून स्वतः पीक पेरा भरण्यासाठी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी केले आहे.