माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:55+5:302021-07-20T04:14:55+5:30
- हभप अशोक महाराज जायले, संत भास्कर महाराज पालखी, अध्यक्ष. ------------------------- वारी हा वारकऱ्याच्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण ...
- हभप अशोक महाराज जायले, संत भास्कर महाराज पालखी, अध्यक्ष.
-------------------------
वारी हा वारकऱ्याच्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण आहे. आषाढीच्या वारीची आस प्रत्येक वारकऱ्याला सहा महिन्यांपासून लागत असते. वारी वारकऱ्यांचा प्राण असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी खंडित झाल्याने दु:ख होत आहे. देवाने कोरोनाचे संकट दूर करावे व वारी पुन्हा सुरू व्हावी, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
-हभप राजू महाराज कोकाटे
-------------------------
वारकरी संतांनी वारीचं माहात्म्य सांगितले आहे. मी संत भास्कर महाराज पालखी सोहळ्यात वीणेकरी म्हणून गत २५ वर्षांपासून पायदळ वारी करीत आहे. या वारीतील अनुभव माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. माझे जीवन धन्य झाले आहे. परंतु, गत वर्षापासून वारी खंडित झाल्याचे शल्य सारखे बोचत राहते. पंढरपूर हे वारकऱ्यांचे माहेर आहे. विठोबाचे परम् दर्शन व संतजनांच्या सहवासापासून मी पारखा झालो आहे. शासनाने नियम शिथिल करून वारकऱ्यांना वारीची परवानगी द्यायला पाहिजे होती. मनाला खंत वाटते. पंढरी वारी न चुकावी हीच मनोमन इच्छा आहे.
हभप मोहन महाराज रेळे, वडाळी सटवाई
----------------------
पंढरीची वारी, आहे माझे घरी!
पंढरीनाथाच्या परम् दर्शनाची आंतरिक ओढ असून, वारी खंडित झाली, ही मनाला अस्वस्थ करणारी आहे. कोरोना आपत्तीने हा माहेराचा आनंदच जणू हिरावून घेतला आहे. विठुरायाचे अस्तित्व चराचरांत आहे. गुरूवर्य वासुदेव महाराजांनी आषाढी यात्रेत विठ्ठल चरणी देह ठेवून विठ्ठलरूप झाले, हा भावार्थ हृदयात साठवून श्रद्धासागर क्षेत्री गुरूवर्य महाराजांचे दर्शनाने पंढरीची वारी झाल्याचे समाधान प्राप्त झाले.
हभप विष्णू महाराज गावंडे
----------------------------
पंढरपूर मानस वारी केली!
माझे घरी पिढ्यान्पिढ्या पंढरीची वारी आहे. विठुरायाने बोलावले तरच वारी घडते. भगवंतास भक्तांचे जीविताची काळजी आहे. कोविड आपत्तीकाळात पंढरीला न जाता घरीच विठ्ठलाचे नामस्मरण करणे, हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. त्यामुळे पंढरीला न जाता विठ्ठलनामाचा गजर करीत मानस वारी मी पूर्ण केल्याचे समाधान आहे.
हभप ज्ञानेश्वर महाराज वसू.
------------------------
पंढरीची वारी परम् भाग्याचा क्षण
वारी परंपरेत ३१ वर्षे अखंडित पंढरीची वारी केली. पंढरीनाथाचे परम् दर्शन आणि संतजनांचा सहवास हा माझ्या जीवनाचा परम् भाग्याचा क्षण आहे. पंढरीची वारी गत दोन वर्षांत खंडित झाल्याने काहीतरी हरवल्यासारखे वाटते. ही मनाला वेदना देणारा प्रसंग का यावा, पंढरीनाथा! वारीचा मार्गच बंद झाला आहे. हे संकट दूर सारून पंढरीची वारी चुकू देऊ नको.
हभप सुधाकरराव महाराज पुंडकर.