नाफेड केंद्रावरील घोळाची चौकशी होणार!
By admin | Published: May 20, 2017 01:15 AM2017-05-20T01:15:46+5:302017-05-20T01:15:46+5:30
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले आहे. या वृत्ताची दखल घेत सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी १६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तेल्हारा येथे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू केले. सुरुवातीपासूनच या केंद्रावर अनेक गैरप्रकार झाले आहेत. बोगस टोकन देऊन व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर मोजण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर मृत शेतकऱ्याच्या नावावर तूर विकल्याचा प्रताप बाजार समितीने केला आहे. पुरवणी टोकनच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस टोकनचे वाटप बाजार समितीने केले. बाजार समितीच्या रेकॉर्डमध्ये अनेक ठिकाणी खोडाखोड करण्यात आली आहे, तसेच रेकॉर्डवर ८२ नग असताना १८२ करणे व पुरवणी टोकन देऊन मोजमाप केल्याचा प्रकारही या केंद्रावर घडला होता. संचालकांच्या नावाने रेकॉर्डला नगाची नोंद असून, वाहन क्रमांकच टाकलेले नाहीत. बाजार समितीचे सभापती यांच्या मुलीच्या नावाची बाजार समितीच्या रेकॉर्डवर नोंद आहे; मात्र नगाचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. तुदगाव येथील शेतकऱ्याच्या नावावर २२४ नगाची नोंद आहे; मात्र ते कोणत्या वाहनाने आणले, याचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. मनब्दा येथील शेतकरी संतोष जानराव पाथ्रीकर यांनी २६ फेब्रुवारी २०१७ रोजी १७२ नग तूर आणली होती. त्यांच्या १०८२ याच टोकनवरून १० शेतकऱ्यांना पुरवणी टोकन देण्याचा प्रताव बाजार समितीने केला आहे. विशेष म्हणजे, पुरवणी टोकन केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांनाच देता येते; परंतु पाथ्रीकर यांच्या नात्यात नसलेल्याही अनेकांना बाजार समितीने पुरवणी टोकनचे वाटप करून त्यांची तूर मोजली आहे.
बाजार समितीतील या सर्व गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना तेल्हारा नाफेड केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधक अकोला व जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनाही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे.