नाफेड, पणन महासंघाच्या शेतमाल खरेदीस विलंब
By admin | Published: October 10, 2014 11:10 PM2014-10-10T23:10:52+5:302014-10-10T23:53:21+5:30
सोयाबीन, कापसाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त.
खामगाव (बुलडाणा) : शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी नाफेड तसेच पणन महासंघामार्फत प्र त्येक तालुकास्तरावर केंद्र उघडून शेतमालाची खरेदी करण्यात येते; मात्र यावर्षी अद्यापही हमीदराने शेतमाल खरेदी केंद्र सुरु झाली नसल्याने व्यापार्यांकडून शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे.
यावर्षी नैसर्गिक संकटांची मालिकाच शेतकर्यांना सोसावी लागत आहे. यंदा पाऊस विलंबाने आल्याने, पेरण्या रखडल्या. परिणामी शेतकर्यांचे पीक नियोजन कोलमडून, अन्य पिकांची पेरणी करावी लागली. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने, अनेकांचे सोयाबीन पीक शेंगा परिपक्व होण्याआधीच वाळले. तसेच कापसावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे यावर्षी पेरणीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. शेतकर्यांना उत्पादन तर कमी मिळालेच, शिवाय उत् पादनाला भावसुध्दा मिळाला नाही.
शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी शासनाकडून नाफेड तसेच पणन महासंघामार्फत उडिद, मूग, तूर, सोयाबीन, ज्वारी आणि कापसाची खरेदी करण्यात येते; मात्र यावर्षी राज्यात कुठेही खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. त्यामुळे याचा फायदा घेत, व्यापारी शेतकर्यांचा शेतमाल हमीदरापेक्षाही कमी दराने खरेदी करीत आहेत. दिवाळी तसेच रब्बीचा हंगामासाठी शेतकर्यांना नाईलाजाने कमी भावात शेतमाल विकावा लागत आहे.