नाफेडकडून ६,४७० शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 10:41 AM2022-05-28T10:41:43+5:302022-05-28T10:41:49+5:30

Akola News : हरभरा खरेदी केलेल्या १ हजार १२९ शेतकऱ्यांनाच पैशांचे वितरण झाले.

NAFED not paid crores of rupees to 6,470 farmers | नाफेडकडून ६,४७० शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकले!

नाफेडकडून ६,४७० शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकले!

Next

- रवी दामोदर

अकोला : बाजारात हरभऱ्याला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती नाफेडला मिळाल्याचे चित्र आहे. नाफेडकडून ७५९९ शेतकऱ्यांकडून १.२७ लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. नाफेडचे पोर्टल बंद पडल्याने दि. २४ मेपासून खरेदीही बंद झाली आहे. तसेच दि.२० मेपर्यंत हरभरा खरेदी केलेल्या १ हजार १२९ शेतकऱ्यांनाच पैशांचे वितरण झाले असून, जिल्हाभरातील जवळपास ६,४७० शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. अवघ्या आठ दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला असून, पैसे थकल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

रब्बी हंगाम २२-२३ मध्ये हरभऱ्याची हमी भावाने खरेदी करण्यासाठी दि. १६ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी दि. १ मार्चपासून सुरू करण्यात आली. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारची आधारभूत किंमत ५ हजार २३० रुपये प्रतिक्विंटल आहे. दर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल नाफेडकडे वाढला आहे. नाफेडमार्फत दि. २० मेपर्यंत ७ हजार ५९९ शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार ४३३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. दरम्यान, १३ हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, खरेदी बंद असल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. नाफेडमार्फत पूर्ववत खरेदी सुरू करून पैशांचे त्वरित वितरण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

उद्दिष्ट वाढवून पुन्हा पूर्ववत खरेदी सुरू करा - पालकमंत्री बच्चू कडू

 

रब्बी हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याची खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने खरेदी थांबविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेले राज्यातील हजारो शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या शेतकऱ्यांकडे हरभरा पडून आहे. त्यामुळे राज्य शासनाने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून तसेच तारखा वाढवून हरभरा खरेदी प्रक्रिया पुन्हा पूर्ववत करण्याच मागणी पालकमंत्री बच्चू कडू यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

 

५ हजारांवर शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत

नाफेडकडे जिल्ह्यातील १३ हजार ३२४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ ७ हजार ५९९ शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात आली आहे. खरेदी बंद झाल्याने जिल्ह्याभरातील जवळपास ५ हजारांवर शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

Web Title: NAFED not paid crores of rupees to 6,470 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.