गुरू नानक जयंतीनिमित्त नगर कीर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:38 PM2019-11-10T18:38:32+5:302019-11-10T20:08:15+5:30
रविवारी सकाळी अकोल्यातील शीख बांधवांनी शहरातून नगर कीर्तन मिरवणूक काढली.
अकोला : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची ५५० वी जयंती मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून, यानिमित्त रविवारी सकाळी अकोल्यातील शीख बांधवांनी शहरातून नगर कीर्तन मिरवणूक काढली. गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
ऐतिहासिक जयंती उत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन भागातील गुरुद्वारामध्ये शीख बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पहाटेपासूनच या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. गुरुद्वारामध्ये जमलेल्या शीख बांधवांनी पहाटे ६.३० वाजता नगर कीर्तन मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सुमारे ३०० शीख बांधव सहभागी झाले होते. गुरू नानक यांचा जयघोष करीत ही मिरवणूक शहरातील विविध मार्गांनी मार्गक्रमण करीत मिरवणूक पुन्हा रेल्वे स्टेशन भागातील गुरुद्वारामध्ये परत आली. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तेथे शबद-कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी लंगरचेही आयोजन करण्यात आले होते.
२१ किलोचा ‘केक’ ठरला आकर्षण!
शहरातील विविध मार्गांनी गेलेली नगर कीर्तन मिरवणूक जठारपेठ भागातील ‘विरा दा धाबा' येथे आली असता, या ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त २१ किलो वजनाचा केक कापण्यात आला. 'विरास केेक अँड बेेेक'च्या संचाालिका राधिका कौर छटवाल यांनी बनविलेला आठ फूट लांब व चार फुट रुंदीचा हा केक आकर्षणाचे केंद्र ठरला होता. मान्यवरांच्या हस्ते केप कापण्यात येऊन मिरवणुकीत सहभागींना वितरित करण्यात आला.