नाले बांधकामाच्या नियाेजनाचा फज्जा; प्रभाग ८ मध्ये तुंबले सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:58+5:302021-06-27T04:13:58+5:30
हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मागील चार वर्षांत रस्ते, नाले व जलवाहिनीची कामे करण्यात आल्याचा गवगवा केला जात ...
हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मागील चार वर्षांत रस्ते, नाले व जलवाहिनीची कामे करण्यात आल्याचा गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात दर्जाहीन रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. मनपाच्या बांधकाम विभागाने रस्ते, नाल्यांचे याेग्यरित्या नियाेजन न केल्यामुळे ठिकठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अनेक भागात रस्त्याच्या उंचीपेक्षा नाल्यांची उंची वाढविण्यात आल्याचा अजब प्रकार दिसून येताे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा न हाेता पावसाळ्यात नाल्यांमधील घाण पाणी रहिवाशांच्या अंगणात शिरत असल्याचे महिलांनी सांगितले. यामुळे पावसाळ्यातच नव्हे तर नागरिकांना बाराही महिने दुर्गंधी असलेल्या घाण पाण्याचा सामना करावा लागत आहे. प्रभागात भाजपचे तीन नगरसेवक असून ते नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे ढुंकूनही पाहत नसल्याचा आराेप महिला वर्गातून केला जात आहे.
थातूरमातूर नालेसफाई
पावसाळ्याच्या ताेंडावर मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने मेहरे नगर, बाळापूर राेड ते गाेकर्णा पार्कपर्यंत येणाऱ्या मुख्य नाल्याची थातूरमातूर सफाई केली. नाले सफाई हाेत नसल्यामुळे लक्ष्मी नगर, अमरप्रीत काॅलनी, बालाजी नगर, संताजी नगर, पाेलिस वसाहत, गजानन नगर गल्ली क्रमांक १, मनाेरथ काॅलनी, गंगा नगर, कायनात काॅलनी, काळे नगर, साइ नगर, नारायण नगरमध्ये सांडपाण्याची कायम आहे.
नाल्यांचे बांधकाम करताना नियाेजन न केल्यामुळे नाल्यांमधील सांडपाण्याचा निचरा हाेत नाही. पावसाळ्यात नाल्यांमधील पाणी अंगणात शिरते. नगरसेवक फिरकतही नाहीत.
-नंदा राऊत, रहिवासी
आमच्या भागात नाले सफाईकडे काेणी ढुंकूनही पाहत नसल्याने नाल्या घाणीने तुडुंब साचल्या आहेत. पावसाळ्यात या समस्येत अधिकच वाढ हाेते. मनपा प्रशासन गाढ झाेपेत आहे.
- विमल नंदनवार, रहिवासी
माेठ्या नाल्यांचे बांधकाम करताना पाण्याचा प्रवाह काेणत्या दिशेने जाईल, याकडे दुर्लक्ष करीत थातूरमातूरपणे नाले बांधण्यात आले. मुख्य रस्त्यावरील क्वालिटी दुकानापासून ते दळवी यांच्या घरापर्यंत नाल्याचा उलटा प्रवास केला. परिणामी सांडपाणी तुंबले आहे.
-दिनेश सराेदे, रहिवासी
हद्दवाढ केल्यानंतर मनपाने केवळ टॅक्सच्या रकमेत वाढ केली. त्याबदल्यात स्वच्छतेच्या कामांचा पुरता बाेजवारा उडाला असून यामुळे लहान मुलांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे.
- गणेश गांडाळ, रहिवासी