जामठी-कार्ली मार्गावरील नाल्याला पूर; एक तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:53+5:302021-07-20T04:14:53+5:30
जामठी बु.: मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे जामठी-कार्ली-कामरगाव मार्गावरील जामठी फाट्यानजीक नाल्याला ...
जामठी बु.: मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे जामठी-कार्ली-कामरगाव मार्गावरील जामठी फाट्यानजीक नाल्याला पूर आल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. नाल्याला पूर असल्याने वाहने दोन्ही बाजूस अडकून पडले होते. पावसामुळे शेतशिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
जामठी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे नदी, नाले वाहू लागले होते. जामठी फाट्यानजीक असलेल्या नाल्याला व कार्लीनजीक असलेल्या नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प होती. परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने अफसर खाॅ, भरत कस्तुरे, शेजे, बांगर यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
---------------------
प्रवासी पडले अडकून
जामठी परिसरातील गावांतील नागरिकांसाठी जामठी-कार्ली-कामरगाव मार्ग महत्त्वाचा असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गाने जामठी, कार्ली, बोरगाव निंघोट, बेंबळा, कामरगाव, आदी गावांतील ग्रामस्थांची वर्दळ असते. सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जामठी फाट्यानजीक असलेल्या नाल्याला पूर आल्याने प्रवासी अडकून पडले होते. पुराचा जोर ओसरताच वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
------------------------
पिकांचे नुकसान
जामठी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतशिवारात पाणी साचले होेते. पाणी थांबल्याने शेतशिवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. शेतात सद्य:स्थितीत पिके बहरलेली आहेत. मात्र, सोमवारी आलेल्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून, नुकसान झाले आहे.
-------------------------