‘कॅशलेस’च्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक!
By admin | Published: April 21, 2017 02:03 AM2017-04-21T02:03:37+5:302017-04-21T02:03:37+5:30
अकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.
पीक कर्ज मंजूर; पण रक्कम मिळेना
अकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे रोखरहित (कॅशलेस) व्यवहाराच्या नावाखाली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवून कर्जाची रक्कम देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सन २०१७-१८ यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकमार्फत १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी सभासद असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १७ हजार ७४७ शेतकऱ्यांना १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर करण्यात आले. शासनाच्या रोखरहित (कॅशलेस) धोरणानुसार पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी रोख रकमेऐवजी ‘किसान क्रेडिट कार्ड’ दिले जात आहे; परंतु शेतकऱ्यांना शेतीची मशागत, मजुरांना द्यावयाची मजुरी, मुला-मुलींचे लग्न व इतर खर्च भागविण्यासाठी रोख रकमेची गरज असल्याच्या पृष्ठभूमीवर मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा ‘एटीएम’मध्ये लागत आहेत; मात्र ‘एटीएम’मध्ये पैसे नसल्याने, पीक कर्ज मंजूर झाले असले, तरी रक्कम मिळत नसल्याने खर्च भागविण्यासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर ‘कॅशलेस’च्या नावाखली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असून, मंजूर करण्यात आलेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ‘एटीएम’मध्ये रक्कम उपलब्ध करून कर्जाच्या रकमेमुळे होणारी अडवणूक थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अनेक शेतकऱ्यांकडे नाही ‘एटीएम कार्ड’!
पीक कर्ज मंजूर झालेले शेतकरी कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना ‘एटीएम’मध्ये चकरा माराव्या लागत आहेत; मात्र जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे ‘एटीएम कार्ड’ उपलब्ध नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढणार कशी आणि खर्च भागविणार कसा, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट; शेतकरी हतबल!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे खरीप पीक कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानुसार मंजूर पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ४२ ‘एटीएम’मध्ये रांगा लागत आहेत; मात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम देण्यासाठी एटीएममध्ये रक्कम उपलब्ध नाही. ‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट असल्याने पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकरी हतबल झाला आहे.