शाळा अनुदानित असूनही इतर खर्चाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 03:30 PM2018-08-07T15:30:58+5:302018-08-07T15:34:24+5:30
अकोला : शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता येत नाही. असे असताना, होलीक्रॉस शाळेकडून इतर खर्चाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची नियमबाह्य लूट केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
अकोला : शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता येत नाही. असे असताना, होलीक्रॉस शाळेकडून इतर खर्चाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची नियमबाह्य लूट केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. वर्गशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांकडून २५०० रुपये आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे.
शहरातील होलीक्रॉस हायस्कूलला शासनाचे अनुदान प्राप्त आहे. या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना शिक्षण नि:शुल्क आहे. या शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीत एकूण ११०० विद्यार्थी शिक्षण घेतात. होलीक्रॉस हायस्कूलला शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान मिळते. अनुदानित शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत आहे आणि या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेता येत नाही, असा शासनाचा निर्णय आहे. असे असतानाही होलीक्रॉस हायस्कूलचे व्यवस्थापन दरवर्षी विद्यार्थ्यांकडून इतर खर्चाच्या नावाखाली प्रत्येकी अडीच हजार रुपयांची वसुली करीत आहे. यंदासुद्धा शाळेतील वर्गशिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांकडून अडीच हजार रुपये आणण्यास बजावले आहे. नव्हे, तर दररोज विद्यार्थ्यांना पैसे आणले का? असा तगादाच वर्गशिक्षकांकडून लावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी पालकांकडे पैशांची मागणी केली. काही पालकांनी काहीही आढेवेढे न घेता विद्यार्थ्यांना पैसे दिले. परंतु, काही जागरूक पालकांनी, विद्यार्थ्यांकडे विचारणा केली असता, शाळेने इतर खर्च म्हणून अडीच हजार रुपयांची मागणी केली असल्याचे सांगितले. शाळेला शासकीय अनुदान मिळत असताना, आम्ही पैसे कशासाठी द्यायचे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, दिलेल्या पैशांची कोणतीही पावती होलीक्रॉस हायस्कूल व्यवस्थापनाकडून पालकांना देण्यात येत नाही. यासंदर्भात पालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
२७ लाखांच्या वसुलीचा हिशेब नाही!
होलीक्रॉस हायस्कूल दरवर्षी इतर खर्चाची सबब पुढे करून विद्यार्थ्यांकडून पैशांची वसुली करते.विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी अडीच हजार रुपये वसूल केले, तर ती रक्कम २७ लाखांवर पोहोचते. दरवर्षी शाळा अशा पद्धतीने लाखो रुपये गोळा करते. विशेष म्हणजे, या पैशांची पालकांना पावती मिळत नाही. या पैशाचे कोणतेही लेखापरीक्षण (आॅडिट) होत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टिकोनातून पालक गप्प बसतात आणि शाळा त्याचाच फायदा घेत असल्याचे एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
होलीक्रॉस हायस्कूल हे अनुदानित आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांकडून कोणत्याही कारणांसाठी पैसे घेता येत नाही. शाळा विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. ही गंभीर बाब आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी