मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या ६८ हजार मतदारांची वगळणार नावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:14 AM2021-05-03T04:14:18+5:302021-05-03T04:14:18+5:30
अकोला: मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या ...
अकोला: मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या ६८ हजार ८२५ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत सुरु करण्यात आलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मतदार यादीत मतदारांच्या नावासमोर छायाचित्र नसलेल्या मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यासाठी मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची माहिती संकलित करण्याची मोहीम दीड महिन्यांपूर्वी जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात आली. जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ६७ हजार ८०० मतदार असून , त्यामध्ये ७ लाख ५९ हजार ५४ महिला मतदार व ८ लाख ८ हजार ७२१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १५ लाख ६७ हजार ८०० मतदारांपैकी ६८ हजार ८२५ मतदारांची छायाचित्र मतदार यादीत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत संकलित करण्यात आली. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय छायाचित्र
नसलेल्या मतदारांची अशी आहे संख्या
मतदारसंघ मतदार
अकोट ७२६१
बाळापूर ५१४६
अकोला पश्चिम २४२१४
अकोला पूर्व १६२०७
मूर्तिजापूर १५९९७