संभाव्य उमेदवारांची नावं मागितली बंद लिफाफ्यात, निवडणुकीसाठी भाजपचा प्रयोग
By आशीष गावंडे | Published: October 1, 2024 06:06 PM2024-10-01T18:06:32+5:302024-10-01T18:07:00+5:30
राज्यात व केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपला सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या साथीने तब्बल २३ जागांवर विजय मिळाला होता.
- आशिष गावंडे
अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भाजपने निवडक पदाधिकाऱ्यांकडून संभाव्य तीन उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात मागण्याचा प्रयोग मंगळवारी केला. ही प्रक्रिया विधानसभा मतदारसंघ निहाय राबविण्यात आली असून आपल्या मनातील उमेदवाराला तिकीट मिळणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात व केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपला सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या साथीने तब्बल २३ जागांवर विजय मिळाला होता. यंदा ही युती नसल्याचा परिणाम म्हणून की काय, लोकसभा निवडणुकीत २३ जागांवरून चक्क ९ जागा पदरात मिळालेल्या भाजपला आता पक्षातील जुन्या जाणत्या व प्रामाणिक कार्यकर्त्यांची आठवण झाली आहे.
कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार जाणून घेण्यासाठी राज्यभरात एकाच दिवशी संभाव्य उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात मागण्याचा प्रयोग करण्यात आला. अकोला पूर्व विधानसभेची जबाबदारी आमदार श्वेता महाले, अकोला पश्चिमची जबाबदारी आ. अॅड. आकाश फुंडकर, मुर्तिजापूर मतदारसंघात नागपूरचे आ. मोहन मते, अकोट मतदार संघात यवतमाळचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
८६८ जणांनी दिला लिफाफा
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून ३२१, अकोला पश्चिममधून ३५०, मूर्तिजापूरमधून २५ व अकोट मतदार संघातून १७२ अशा एकूण ८६८ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. प्रत्येकाकडून संभाव्य तीन उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात घेण्यात आली.