नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेसचं दर आठवड्याचं रडगाणं; सुरत, बिकानेरला जाणारे प्रवासी त्रस्त
By Atul.jaiswal | Published: September 12, 2022 12:44 PM2022-09-12T12:44:56+5:302022-09-12T12:46:12+5:30
नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६.५० वाजता निघणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता अकोल्यात येऊन पुढे भुसावळमार्गे श्रीगंगानगरला रवाना होते. परतीच्या प्रवासात शनिवारी सुटणारी ही गाडी रविवारी रात्री २१.२० वाजता अकोल्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे २.३० वाजता नांदेड येथे पोहोचते.
अकोला : अकोल्यासह वाशिम, हिंगोली जिल्ह्यांतील प्रवाशांना सुरत, अहमदाबाद, बिकानेरमार्गे थेट राजस्थानमध्ये घेऊन जाणारी नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गत अनेक आठवड्यांपासून प्रस्थान स्थानकावरूनच पाच ते सहा तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या रेल्वेगाडीच्या रेकचा वापर नांदेड-तिरूपती एक्स्प्रेसकरिता होत असल्याने दर आठवड्याला ही गाडी गंतव्यस्थळी सहा ते आठ तास उशिरा पोहोचत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर व महाराष्ट्रातील नांदेड या दोन स्थानकांदरम्यान १७६२३/१७६२४ नांदेड-श्रीगंगानगर-नांदेड ही साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी धावते. विदर्भातील अकोला, वाशिमसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील प्रवासी व व्यापाऱ्यांना थेट सुरत, अहमदाबाद, बिकानेर या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने ही गाडी लोकप्रिय ठरली आहे.
नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६.५० वाजता निघणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता अकोल्यात येऊन पुढे भुसावळमार्गे श्रीगंगानगरला रवाना होते. परतीच्या प्रवासात शनिवारी सुटणारी ही गाडी रविवारी रात्री २१.२० वाजता अकोल्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे २.३० वाजता नांदेड येथे पोहोचते. त्यानंतर गुरुवारपर्यंत ही गाडी नांदेड येथे यार्डात उभी राहत असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेने या गाडीच्या रेकचा वापर ०७६४१/०७६४२ नांदेड-तिरूपती-नांदेड एक्स्प्रेससाठी सुरू केला. सोमवारी रात्री नांदेड येथून तिरूपतीला निघणारी ही गाडी मंगळवारी रात्री गंतव्यस्थळी पोहोचते.
परतीच्या प्रवासात मंगळवारी रात्री ११.५० ला निघणारी ही गाडी बुधवारी रात्री ११.४५ वाजता पोहोचते. तथापि, परळी व लातूर येथे दोन वेळा इंजिन मागे-पुढे करणे व विशेष गाडी असल्यामुळे नियमित गाड्या आधी जाऊ द्याव्या लागत असल्यामुळे या गाडीला नांदेड येथे पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे रेकच्या मेंटेनन्सला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी गत काही आठवड्यांपासून नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसला गुरुवारी पहाटे ६.५० या निश्चित वेळेत रवाना करणे शक्य होत नाही.
व्यापाऱ्यांची होत आहे गैरसोय
पूर्णा, वसमत, हिंगोली, पुसद, वाशिम, रिसोड, अकोला येथील शेकडो व्यापारी सुरत, अहमदाबाद, वडोदरा, बिकानेर या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्ये व्यवसायानिमित्त जाण्यासाठी नांदेड-श्रीगंगानर एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. परंतु, गत काही आठवड्यांपासून ही गाडी उशिरा सुटत असल्यामुळे सुरत येथे मध्यरात्री पोहोचत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना रात्रीच्या वेळी भटकंती करावी लागत आहे.