नापिकीने कोलमडले तेल्हारा तालुक्यातील शेतकर्यांचे बजेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:54 AM2017-12-05T01:54:13+5:302017-12-05T01:56:48+5:30
दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्या शेतकर्यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात मनोधैर्य खचल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
अनिल अवताडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : शेतकर्यांच्या बारा महिन्याच्या उदरनिर्वाहाची, मुलांच्या शिक्षणाची, घरातील सदस्यांच्या लग्नसमारंभाची, घरातील इतर खर्चाची तरतूद यासह जीवनातील आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी शेतकर्यांची नजर ही शेतातून येणार्या कापूस, सोयाबीन, उडीद, ज्वारी या मुख्य पिकांकडे लागलेली असते. त्याकरिता दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्या शेतकर्यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात मनोधैर्य खचल्याचे विदारक चित्र तेल्हारा तालुक्यात दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. त्यामध्ये जुन्या कापसाचा जीन काढून त्यातून निघालेली सरकी, आधीच्या वर्षाच्या पिकातून ज्वारी, उडीद, मूग, सुरक्षित ठेवून त्याचा पेरणीकरिता वापर केला जात असे. रासायनिक औषधांचे नावही शेतकर्यांना माहीत नव्हते. पेरणीपुरताच रासायनिक खताचा वापर केला जात असे. अशाही परिस्थितीत कमी खर्चात समाधानकारक उत्पन्नाची सांगड लावण्यात शेतकरी यशस्वी होत होते; परंतु काळ बदलत गेला, नवनवीन कंपनीचे बियाणे शेतकर्यांनी स्वीकारले. त्यामध्ये मुख्य पीक असलेल्या कापसाकरिता बीटी बियाण्याचा स्वीकार शेतकर्यांनी केला. याव्यतिरिक्त रासायनिक महागडे बियाणे विकत घेऊन उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आणि त्यात यशस्वी झाले.
आजही तीच परंपरा कायम आहे. याही वर्षी महागडे बीटी कापसाचे बियाणे शेतकर्यांनी घेतले. एकरी चार-पाच पोते रासायनिक खत, कीटकनाशकांचे महागडे फवारे, निंदण, रखवाली यासह एकरी ३0 हजार रुपये खर्च जमिनीत टाकला. सुरुवातीला शेतातील पीक जसजसे बहरत गेले, तशा उत्पन्नाच्या आशा पल्लवित होत गेल्या; परंतु सोयाबीन, उडीद व मुगाच्या परिपक्वतेच्या काळात निसर्गाने शेतकर्यांची साथ सोडली. पर्हाटीच्या बोंड्या फुटण्याआधीच परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे तोंडी आलेला घास हिरावल्या गेला. आजपर्यंत कधी न आलेली एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील बोंडअळी पर्हाटीला नेस्तनाबूद करून, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस उलंगवाडी पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकर्यांनी अनुभवली.
शेतकर्यांचे मनोधैर्य खचले
जमिनीला पेरणीपासून तर आतापर्यंतचा खर्चही न निघाल्याने शेतकर्यांचे बजेट कोलमडले. ज्या पिकाच्या भरवशावर शेतकर्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या लग्नसमारंभाची योजना आखली ते पीकच आले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी लग्नसमारंभ पुढे ढकलले. मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी आपल्या मुलांना शहरात शिक्षणाकरिता भाड्याने खोली घेऊन राहण्याकरिता लागणारा खर्च, उधारीवर घेतलेले बियाणे, रासायनिक फवारे याची बाकी असलेली उधारी, बारा महिन्याचा खर्च, कर्जमाफीचा गुंता अजूनही कायम असून, पुढील वर्षाची करावी लागणारी पेरणी, गुरांना लागणारा चारा, कुटुंबाचा दवाखाना खर्च, यासह जीवनावश्यक असणार्या कोणत्याच बाबींची पूर्तता या वर्षीच्या पिकातून होण्याची आशा मावळल्याने शेतकर्यांचे मनोधैर्य खचल्याचे भयाण वास्तव दिसून येत आहे.