नारायण देशमुख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:08+5:302021-03-16T04:19:08+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम धामोरीचे मूळ रहिवासी अकोला येथे वास्तव्यास असणारे सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी नारायण ऊर्फ विलास माधवराव ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम धामोरीचे मूळ रहिवासी अकोला येथे वास्तव्यास असणारे सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी नारायण ऊर्फ विलास माधवराव देशमुख यांचे दि. १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजता दीर्घ आजाराने नागपुरात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नीसह खूप मोठा आप्त परिवार आहे.
--------------------------------------------
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
तेल्हारा : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तेल्हारावासीयांकडून होत आहे.
-----------------------
टाकळी परिसरात रानडुकरांचा हैदाेस
बाळापूर : तालुक्यातील टाकळी, नांदखेड, खिरपूरी बु. शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांचे कळप मुक्त संचार करत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वनविभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------
अभ्यासिका सुरू करण्याची मागणी
अकोट : मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने शहरातील अभ्यासिका बंद आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणतीच अभ्यासिका सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शहरातील अभ्यासिका सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
--------------------------------
‘लॉकडाऊन न करता पर्यायी मार्ग काढा!’
बार्शीटाकळी : लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन न करता यातून पर्यायी मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
----------------------------------------
गॅस दरवाढ झाल्याने स्वयंपाक पुन्हा चुलीवर!
वाडेगाव : गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गृहिणी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र वाडेगाव, दिग्रस बु. परिसरात दिसून येत आहे. उज्ज्वला याेजनेंतर्गत अनेकांना मोफत गॅस मिळाला असला, तरी दरवाढ झाल्याने गॅस परवडत नसल्याचे चित्र आहे.
---------------------------
हरभरा उत्पादनात घट; शेतकरी चिंतित
रोहणखेड : वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान संभवत आहे. अनेक शेतकऱ्यांना उत्पादनात घट येत असल्याने लागवडी खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. परिसरात एकरी तीन ते चार क्विंटलचा उतारा होत असल्याचे चित्र आहे.
--------------------------------
शौचालय वापराकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष
निहिदा : गाव परिसर सदोदित स्वच्छ राहावा, यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनेकांना शौचालये उभारून देण्यात आली आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत असल्याचे चित्र आहे.
----------------------------------
मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत!
तेल्हारा : कोरोना संकटातून मध्यंतरी दिलासा मिळाल्यानंतर लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून मर्यादित उपस्थितीचे बंधन लागू करण्यात आल्याने मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत सापडले आहेत.
----------------------------------
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त!
बोरगाव मंजू : यावलखेड ते सांगळूद रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने अपघातात वाढ झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
----------------------------------
पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी!
मूर्तिजापूर : सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. त्यांना त्वरित लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---------------------------------
गहू सोंगणीसाठी शेतकऱ्यांची लगबग
पातूर : मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यात रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सध्या गहू पिकाची काढणी सुरू आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी आधीच त्रस्त झाले आहेत. त्यातच हार्वेस्टरचे गहू काढण्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत.
----------------------------------
पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रतीक्षा!
अकोट : तालुक्यातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरवर्षी पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
----------------------------
आंबा बहरला, चांगल्या उत्पादनाची आशा
निहिदा : गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गावरान आंब्यांची चव चाखायला मिळाली नाही. ऐन मोसमात लॉकडाऊन घोषित झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले; मात्र यंदा पोषक वातारणामुळे निहिदा परिसरात आंबा बहरला असून, चांगले उत्पादन होण्याची आशा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे.
-------------------------------------------
सरपणासाठी महिलांची शेतात भटकंती
आलेगाव : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. घरगुती गॅसच्या किमतीतही वाढ झाल्याने पुन्हा ग्रामीण भागात चुली पेटल्या असून, सरपणासाठी भटकंती सुरू झाली आहे.
-----------------------------------------------------------------------------