नारायण राणे गंजलेली ताेफ; फडणवीस यांचा अनुभव कमी पडताे - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 10:36 AM2020-11-28T10:36:57+5:302020-11-28T11:07:50+5:30
Jayant Patil Press in Akola अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
अकाेला: महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे काम करत आहे. ते सक्षम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आराेप करत सुटले आहे. फडणवीसांना विराेधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली ताेफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गाेळ्यांना आम्ही अन् माताेश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टाेला हाणला.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ अकाेल्यात शुक्रवारी घेतलेल्या सभेनंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की राज्यात काेराेना आटाेक्यात आला आहे. अजून प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे भाजपावाले सरकार पाडण्याचे राेज मुहूर्त काढत आहेत. त्यांच्या मुहूर्तामध्येच आम्ही वर्षपूर्तीकडे वाटचाल केली आहे. सत्ता गेल्याचे दु:ख ते पचवू शकले नाही. त्यामुळे सरकारवर बेछुट आराेप करीत आहे. त्यांची सारी उठाठेव ही चर्चेत राहण्यासाठीच आहे. त्यांना विराेधी पक्षनेते पद किती गांभीर्याने घ्यावे लागते, याचा अनुभव नाही. त्यांनी अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
भाजपातील काही आमदार संपर्कात
इतर पक्षातून भारतीय जनता पक्षात गेलेल्या नेत्यांना आता आपली मुस्कटदाबी हाेते असे वाटत आहे, तर उपऱ्यांना पदे मिळाली व भाजप निष्ठावंत उपेक्षीत राहिले, अशी भावना त्यांच्या पक्षातील अनेक आमदारांची आहे. असे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. सध्याच किती आहेत, याचा आकडा जाहीर करणे याेग्य नाही; मात्र अशा काठावरच्या आमदारांना दिलासा देण्यासाठीच आमचे सरकार येणार, अशी बतावणी भाजप करीत असल्याचाही आराेप जयंत पाटील यांनी केला.