अरुंद ‘आरओबी’ ठरतोय शिवर-रिधोरा चौपदरीकरणात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:08 PM2019-11-23T13:08:50+5:302019-11-23T13:09:01+5:30

शिवर ते रिधोरा मार्गाच्या चौपदरीकरणात महाबीज कार्यालयाजवळील अरुंद आकाराचा रेल्वे ओव्हर ब्रीज अडसर ठरत आहे.

The narrow 'ROB' leads obstacles Shivar-Ridhora road widening work | अरुंद ‘आरओबी’ ठरतोय शिवर-रिधोरा चौपदरीकरणात अडसर

अरुंद ‘आरओबी’ ठरतोय शिवर-रिधोरा चौपदरीकरणात अडसर

Next

- संजय खांडेकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवर ते रिधोरा मार्गाच्या चौपदरीकरणात महाबीज कार्यालयाजवळील अरुंद आकाराचा रेल्वे ओव्हर ब्रीज अडसर ठरत आहे. दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने ओव्हर ब्रीजच्या खालील भागात ६० मीटरचा स्पॅन सोडण्याची अट घातली आहे; मात्र ही अट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास मान्य नाही. प्रशासनाच्या तांत्रिक पेचामुळे गत एक वर्षापासून या मार्गाचे चौपदरीकरण थांबले होते. अजूनही त्यावर ठोस पर्याय न निघाल्याने अरुंद आरओबी चौपदरीकरणात अडसर ठरत आहे.
शिवर ते रिधोरा या जुन्या मिनी बायपासच्या चौपदरीकरणास प्रारंभ होत असून, या मार्गावरील ४८२ वृक्षतोडीला महसूल विभागाने परवानगी दिली आहे. औरंगाबादच्या कंपनीने १३६ कोटींत सिमेंट काँक्रिटच्या चौपदरीच्या निर्माणाचे कंत्राट घेतले आहे. शिवरपासून रिधारोकडे जात असलेल्या या चौपदरीकरणात महाबीजजवळ जुना रेल्वे ओव्हर ब्रीज येतो.
अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर असलेला आरओबी ६० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. जर या मार्गाचे चौपदरीकरण करायचे असेल, तर या आरओबीचा विस्तार करणे क्रमप्राप्त आहे; मात्र दक्षिण-मध्य रेल्वेने घातलेली अट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास शक्य नाही. जर तसे केले तर यातील मोठी रक्कम केवळ आरओबीच्या विस्तारीकरणावर खर्च होईल. केंद्र सरकारने एकतर चौपदरीकरणासाठी अतिरिक्त निधी द्यावा किंवा दक्षिण-मध्य रेल्वेने घातलेली अट शिथिल करावी, अशा आशयाचा प्रस्तावही राष्ट्रीय प्राधिकरणाने केंद्राकडे पाठविला आहे.


३०-३५ मीटरच्या स्पॅनला प्राधिकरणाची संमती
६० वर्षांपूर्वी महाबीजजवळ बांधलेले आरओबी ९ मीटर रुंद आहे. त्यालगत नवा आरओबी उभारण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे; मात्र त्यासाठी पुलाखाली ६० मीटर रुंदीचा स्पॅन सोडणे महामार्ग प्राधिकरणास महागात पडणार आहे. प्राधिकरणाने ३० ते ३५ मीटर रुंदीच्या आरओबीची तयारी दर्शविली आहे; मात्र ६० मीटरचा मोठा स्पॅन सोडणे प्राधिकरणाला शक्य नाही, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

चौपदरीकरणाआधी महाबीजच्या आरओबीचा विस्तार करणे गरजेचे आहे. दक्षिण-मध्य रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वयाने यातून मार्ग काढावा, अन्यथा शहरातील आरओबीजवळ बॉटलनेक झाल्याशिवाय राहणार नाही.
-अशोक डालमिया, राष्ट्रीय सचिव,
कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन.

Web Title: The narrow 'ROB' leads obstacles Shivar-Ridhora road widening work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.