नासीर खान हत्याकांडातील आरोपींना पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:45 PM2020-08-24T17:45:16+5:302020-08-24T17:45:22+5:30
न्यायालयाने तीनही आरोपींना २६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नासिर खान अजीज खान याची मंगळवार १८ आॅगस्ट रोजी निर्घृण हत्या केल्यानंतर या हत्याकांडातील तीन आरोपीस तेल्हारा तालुक्यातील घोडेगावच्या जंगलातून अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना २६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर यामधील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला २८ पर्यंत सुधारगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी शेख जुनेद शेख मुख्तार यास अटक करण्यात आली आहे.
शेख जुनेद शेख मुख्तार (३१) रा. हातरुण, अरबाज खान नियाज खान (१९) रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, शेख जावेद शेख मुख्तार (२९) रा. हातरुण, ता. बाळापूर, शेख आमिर शेख खालीद (२९) रा. अडगाव, ता. अकोट या आरोपींनी ६ आॅक्टोबर २०१९ रोजी डाबकी रोडवर घडलेल्या शायदा बानो राजू यादव या महिलेच्या हत्याकांडातील आरोपी नासीर खान अजिज खान याची जामिनावर सुटका होताच १८ आॅगस्टच्या पहाटे अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्वाल धाब्यासमोर निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी सैयद बादशाह सैयद निजाम रा. पाचमोरी यांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला असता नासिर खान याचा जावई शेख जुनेद शेख मुख्तार याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी हे हत्याकांड घडविल्याची माहिती मिळाली. यावरुन बुधवार १९ आॅगस्ट रोजी शेख जुनेद शेख मुख्तार यास अटक केली. त्यानंतर शनिवार २२ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.