राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णच; अपघाताच्या घटना वाढल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:38+5:302021-07-27T04:19:38+5:30
अनंत वानखडे बाळापूर : इंदौर - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पातूर-पारस फाट्यादरम्यान या मार्गाचे काम अर्धवट ...
अनंत वानखडे
बाळापूर : इंदौर - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पातूर-पारस फाट्यादरम्यान या मार्गाचे काम अर्धवट असल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत नागरिकांनी निवेदने दिली; मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अन्यथा नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून, पातूर-पारस फाटादरम्यान महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती; मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिक वैतागले आहेत. महामार्ग खोदून ठेवल्याने अकोला नाका चौकात पावसाचे पाणी साचले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, ग्रामपंचायत आदींना माहिती देऊनही सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. जवळूनच पिण्याचा पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेली असल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूंनी सांडपाणी वाहण्यासाठी नाल्या खोदल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून, वाहने घसरून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
--------------------
निवेदन देऊनही समस्या कायम
महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे, तसेच अकोला नाका चौकातील अतिक्रमण काढून रुंदीकरण व सुशोभिकरण करणे, महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण करणारे विद्युत पोल हटविणे आदी मागण्या केल्या होत्या; मात्र सद्यस्थितीत परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग असल्याने वाहन घसरून सचिन गोतमारे, शुभम पंचभाई आदींसह दुचाकीचालक जखमी झाले आहेत.
-----------------------------------------------
...अन्यथा आंदोलन
महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन अपूर्ण कामाला सुरुवात करून ते त्वरित पूर्ण करावे, अन्यथा महामार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अकोला नाका परिसरातील नागरिकांनी दिला आहे.