राष्ट्रीय कीर्तनकार आमले महाराज अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:55 AM2018-02-10T01:55:28+5:302018-02-10T01:58:55+5:30
गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिला. आदरणीय आमले महाराज यांना अखेरचा निरोप देताना गुरुदेवभक्तांना गहिवरून आले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वसा घेतलेल्या आमले महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर गुरुदेव भक्त व अकोलेकरांनी शुक्रवारी सकाळपासूनच त्यांच्या न्यू खेतान नगर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी या ठिकाणी श्रद्धांजली सभेत गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकार्यांनी शब्दसुमने अर्पित केली. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. न्यू खेतान नगर भागातून त्यांची अंतिमयात्रा काढण्यात आली. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह गुरुदेवभक्त उपस्थित होते. न्यू खेतान नगर मोक्षधाम येथे शेकडो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, सत्यपाल महाराज, जनार्धन बोथे, डॉ. उद्धव गाडेकर, गुलाबराव महाराज, बलदेवराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, अँड. संतोष भोरे, रामेश्वर बरगट, डॉ. गजानन नारे, नीरज आवंडेकर, महादेवराव भुईभार, डॉ. अशोक ओळंबे, सावळे गुरुजी, शिवाजी म्हैसने, सोळंके गुरुजी, बालमुकुंद भिरड, प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, भानुदास कराळे, मनोहरदादा रेचे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गुरुदेव भक्त उपस्थित होते. नागपूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आदी जिल्हय़ांमधून गुरुदेव सेवक अंत्यविधीला उपस्थित होते.
शब्दसुमनांची श्रद्धांजली
मोक्षधाम येथे राष्ट्रसंतांच्या अनुयायांनी आमले महाराज यांना शब्दसुमनांची श्रद्धांजली अर्पण केली. कीर्तनकार उद्धवराव गाडेकर, ज्ञानेश्वर रक्षक, मनोहरदादा रेचे, प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, सावळे गुरुजी, सोळंके गुरुजी, बालमुकुंद भिरड यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.