राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा रविवारी; १६३९ विद्यार्थी देणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 11:40 AM2020-12-12T11:40:05+5:302020-12-12T11:44:27+5:30
NTS Exam on Sunday ही परीक्षा जिल्ह्यातील आठ केंद्रांवर होणार असून, १६३९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
अकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आणि एनसीईआरटी, नवी दिल्ली यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील आठ केंद्रांवर होणार असून, परीक्षेला जिल्ह्यातील १६३९ विद्यार्थी बसणार आहेत. इयत्ता दहावीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिवान विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेतून त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, एनसीईआरटी, नवी दिल्ली यांच्यातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत १०० गुणांसाठी बौद्धिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. तसेच दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत ४० गुणांसाठी शालेय क्षमता चाचणी- सामान्य विज्ञान या विषयावर परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये भौतिकशास्र, रसायनशास्र आणि जीवशास्र या विषयांचा समावेश असणार आहे. तसेच ४० गुण सामाजिक शास्रासाठी असणार आहे. यामध्ये इतिहास राज्यरास्र, भूगोल या विषयांचा समावेश असणार आहे. तसेच २० गुण गणित विषयासाठी, असे एकूण १०० गुणांसाठी दुसरा पेपर घेण्यात येईल. परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून शिक्षकांची निवड करण्यात आली असून, कोरोनाचा धोका पाहता विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, विस्तार शिक्षणाधिकारी अरविंद जाधव, शब्बीर हुसेन, जिल्हा विज्ञान मंच समन्वयक डॉ. रवींद्र भास्कर परिश्रम घेत आहेत.
या केंद्रावर होणार परीक्षा
न्यू इंग्लिश हायस्कूल, होलिक्रॉस कॉन्व्हेंट, जागृती विद्यालय, भारत विद्यालय, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, भाऊसाहेब पोटे विद्यालय, अकोट, मूर्तिजापूर हायस्कूल, मूर्तिजापूर आणि सेठ वंशिधर विद्यालय, तेल्हारा या आठ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.