दहा हजारांच्या कर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांचा ठेंगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:31 AM2017-07-30T02:31:05+5:302017-07-30T03:35:49+5:30
अकोला जिल्ह्यात २८ जुलैपर्यंत तीन बँकांमार्फत केवळ २३४ शेतक-यांना १० हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतक-यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याचा आदेश शासनामार्फत दीड महिन्यापूर्वी काढण्यात आला; मात्र जिल्ह्यात २८ जुलैपर्यंत तीन बँकांमार्फत केवळ २३४ शेतकºयांना १० हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये स्टेट बँक वगळता जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे दहा हजार रुपयांच्या कर्ज वाटपास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठेंगा दाखविल्याचे वास्तव समोर येत आहे.
सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शासनामार्फत जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसंदर्भात गत २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यापूर्वी थकबाकीदार शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनामार्फत गत १४ जून रोजी देण्यात आला.
त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत १६ जून रोजी दिले. दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र २८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक आणि स्टेट बँक आॅफ इंडिया या तीन बँकांमार्फत जिल्ह्यातील केवळ २३४ थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. स्टेट बँक आॅफ इंडिया वगळता जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज वाटप अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज वाटपास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून ठेंगा दाखविण्यात आल्याची बाब समोर येत आहे.
कर्जाचे असे केले वाटप!
बँक शेतकरी
जि.म.सहकारी बँक ४६
विदर्भ-कोकण ग्रामीण बँक ११८
स्टेट बँक आॅफ इडिया ७०
एकूण २३४
शासन आदेशानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपये मर्यादेपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. २८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक व स्टेट बँक आॅफ इंडिया या तीन बँकांमार्फत २३४ शेतकºयांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
-जी.जी. मावळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).