देशी बीटी कापूस फुलला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:38 PM2017-10-03T20:38:14+5:302017-10-03T20:39:52+5:30
अकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे पांढरे सोने वेचणीला आले आहे; पण मजूरच उपलब्ध नसल्याने या कापसाचे नुकसान होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी देशी बीटीची चाचणी घेण्यात येत आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर बियाणे शेतकर्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला होता. या वाणाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, या बियाण्याची चाचणी घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत असलेल्या पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या बियाण्याची पेरणी करण्यात आली आहे.
या पिकांची वाढ पाऊस नसताना सूक्ष्म सिंचनाच्या पाण्यावर झाली असून, हे झाड ४ ते ५ फुटांचे झाले आहे. आता या झाडांना कापूस आला आहे. पांढर्याशुभ्र कापसामुळे काळय़ा आईने पांढरे वस्त्र परिधान केले आहे; पण सलग दोन महिन्यां पासून या कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांचा संप सुरू असल्याने सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता हा कापूस वेचणीला आला आहे; पण मजूरच उपलब्ध नसल्याने कापसाची गळती सुरू आहे.
बीटी कापसाचे पीक जोरात असून, वेचणीला आले आहे. मजूर संपावर असल्याने कंत्राटी मजूर लावून या कापसाची वेचणी करावी लागणार आहे.
- डॉ. दिलीप एम. मानकर,
संचालक, संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.