दुष्काळ निसर्गनिर्मित; पण टंचाई मानवनिर्मित!
By Admin | Published: September 10, 2015 02:21 AM2015-09-10T02:21:01+5:302015-09-10T02:21:01+5:30
जी.श्रीकांत यांचे मत; शहरात पाणीपुरवठय़ाचे हवे योग्य नियोजन.
अकोला: कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; पण टंचाई परिस्थिती सर्वस्वी मानवनिर्मित आहे, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित ह्यसंवादह्ण उपक्रमांतर्गत ते बोलत होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. कमी पावसामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती निसर्गनिर्मित आहे; मात्र उपलब्ध पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे. उपलब्ध पाण्याचा योग्यरीत्या वापर होत नसल्याने निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती ही मानवनिर्मित आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी आरक्षण सप्टेंबरअखेर निश्चित होणार आहे. तथापि महान येथील काटेपूर्णा धरणामधून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जे पाणी घेतले जाते; त्यापैकी ६0 टक्के पाण्याची जलवाहिन्यांच्या दुरवस्थेमुळे गळती होते. त्यामुळे शहरात भेडसावणारी पाणीटंचाई ही मानवनिर्मितच म्हणावी लागेल, असे मत व्यक्त करतानाच, पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शहरात योग्य नियोजनाअभावी निर्माण होणार्या पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर कुठे जलवाहिन्या नाहीत आणि कुठे-कुठे पाणीपुरवठा कमी होतो, यासंदर्भात नगरसेवकांकडून माहिती मागविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी मिळावे, हे आपले स्वप्न असून, त्या दृष्टीने उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) देखील झाले पाहिजे. ह्यरेन वॉटर हार्वेस्टिंगह्ण झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असेही जी.श्रीकांत म्हणाले. ब्रिटिशकाळात अकोला शहराला कापशी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या कापशी तलावाची पुरती दुरवस्था झाली असून, या तलावाच्या विकासाचे काम करून, त्यामधून शहराला पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' प्रभावी अभियान!
कमी पावसामुळे निर्माण होणार्या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे-जिरविण्याच्या उपाययोजना अभियानांतर्गत करण्यात येत आहेत. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी 'जलयुक्त शिवार' अभियान प्रभावी उपाययोजना ठरत असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.
चारा टंचाई निवारणाचे नियोजन!
जिल्ह्यात उपलब्ध होणारा चारा आणि त्या तुलनेत पशुधनाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. तथापि चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास ती निवारणासाठी उपाययोजनांचे नियोजन तयार करण्यात येणार असल्याची ग्वाही जी.श्रीकांत यांनी दिली.