राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष ‘एसीबी’च्या जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:21 AM2017-07-19T01:21:53+5:302017-07-19T01:21:53+5:30
विद्यार्थ्याची तक्रार: शिष्यवृत्ती प्रमाणपत्रासाठी स्वीकारली लाच
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिष्यवृत्तीची पाच हजार रुपयांची रक्कम बँक खात्यातून काढण्यास प्रमाणपत्र मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याकडून दोन हजार रुपयांची लाच मिल्लत उर्दू हायस्कूलचा मुख्याध्यापक व राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष सरफराज खान नवाज खान (५० रा. नेहरू नगर) याने प्रयोगशाळा सहायक अय्याज खान इमदाद खान (४० रा. न्यू जोगळेकर प्लॉट) याच्यामार्फत स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली.
उर्दू मिल्लत हायस्कूलमधील १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार, त्याची शिष्यवृत्ती बँकेत जमा झाली. ही रक्कम काढण्यासाठी या विद्यार्थ्याने मुख्याध्यापक सरफराज खान याच्याकडे प्रमाणपत्र मागितले; परंतु सरफराज खान याने प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्याला तीन हजार रुपयांची मागणी केली. तडजोड करून दोन हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाळेमध्ये सापळा लावला. मुख्याध्यापक सरफराज खान याने लाचेची रक्कम शाळेतील प्रयोगशाळा सहायक अय्याज खान याच्याकडे देण्यास सांगितले. विद्यार्थ्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, ईश्वर चव्हाण यांनी केली.
..तर बँकेत होणार होती मुख्याध्यापकावर कारवाई
शिष्यवृत्तीची रक्कम बँकेतून काढण्यास लागणारे प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्याला मुख्याध्यापक प्रा. सरफराज खान व त्याचा प्रयोगशाळा सहायक अय्याज खान यांनी ३ हजार रुपये मागितले आणि त्यांनी बँकेतून शिष्यवृत्तीचे पैसे काढण्यानंतर बँकेतच तू आम्हाला पैसे दे, असे दोघांनी त्यास म्हटले; परंतु विद्यार्थ्याने आपण पैशांची व्यवस्था केली असून, पैसे शाळेतच देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाळेमध्ये सापळा लावला. तक्रारकर्त्या विद्यार्थ्याने बँकेत पैसे देण्याची तयारी दर्शविली असती तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापक व प्रयोगशाळा सहायकासाठी बँकेत सापळा लावला असता.
- अय्याज खान
राष्ट्रवादी काँग्रेस घेणार राजीनामा
अकोट फैलमधील हाजी नगरातील मिल्लत उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. सरफराज खान नवाज खान यांनी विद्यार्थ्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीरतेने घेतले आहे. प्रदेशस्तरावरून प्रा. सरफराज खान यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्षपदाचे काम सोपविले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय तापडिया यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी, सरफराज खान यांच्या कृत्यामूळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून, त्यांच्यावर प्रदेशस्तरावरून कारवाई होईल. त्यासाठी आपण त्यांच्या बाबतीतला अहवाल पक्षाकडे पाठविणार असल्याचे सांगितले.
- प्रा. सरफराज खान