‘एनसीडी’अंतर्गत ३४ हजारांवर रुग्णांची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:53 AM2020-01-24T11:53:29+5:302020-01-24T11:53:37+5:30
एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत जिल्ह्यात एनसीडी केंद्रांतर्गत ३४ हजार ३४३ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
अकोला : असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यात एनसीडी केंद्रांतर्गत ३४ हजार ३४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले.
बदलती जीवनशैली अन् वाढत्या तणावामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांच्या यादीत कर्करोगापाठोपाठ रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष विषाणूजन्य आजारांपेक्षा जास्त उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांत लक्षणीय वाढ होत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत जिल्ह्यात एनसीडी केंद्रांतर्गत ३४ हजार ३४३ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार ५५५ रुग्ण उच्च रक्तदाबाचे, तर ३ हजार ८४५ रुग्ण मधुमेहाचे असल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच कर्करोग आणि हृदयविकाराच्या रुग्णांचे निदान झाले; पण या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे प्रकाशित ‘नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९’मध्येही देशभरात उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले होते.
असे आहे रुग्णांचे प्रमाण
आजार - पुरुष रुग्ण - महिला - रुग्णांची संख्या
मधुमेह - १,९९७ - १८४८ - ३,८४५
उच्च रक्तदाब - २३०६ - २२४८ - ४,५५५
कर्करोग - ३ - ९ - १२
हृदयविकार - ७ - ५ -१२
स्ट्रोक - ०० - ०० - ००
महिलांच्या तुलनेत पुरुषांची रुग्णसंख्या जास्त
साधारणत: मधुमेह रुग्णांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त असते; मात्र जिल्ह्यात स्त्रियांपेक्षा पुरुष रुग्णांची संख्या जास्त आहे. अहवालानुसार, १ हजार ९९७ पुरुष रुग्ण, तर १ हजार ८४८ रुग्ण महिला असल्याचे समोर आले आहे. शिवाय, उच्च रक्तदाबाचे २ हजार ३०६ पुरुष रुग्ण, तर २ हजार २४८ महिला रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. निदानासाठी एनसीडी केंद्र कार्यरत आहेत. याच माध्यमातून अशा रुग्णांचे निदान करणे शक्य झाले. नागरिकांनी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.