राकाँच्या जि. प., ‘वंचित’च्या पं. स. उमेदवारांची यादी जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:11 AM2021-07-05T10:11:47+5:302021-07-05T10:11:57+5:30
Akola ZP By-election : २५ जागांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली.
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज, सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने उमेदवारांची यादी आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या २५ जागांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी उमेदवारांची यादी ३ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या ९ जागांसह पंचायत समित्यांच्या १५ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या दगडपारवा, कुटासा, कानशिवणी, बपोरी व तळेगाव या ५ जागांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने उमेदवारांची यादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी ४ जुलै रोजी जाहीर केली. तसेच जिल्हयातील सात पंचायत समित्यांच्या २५ गणांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारांची यादी ४ जुलै रोजी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट व दिनकर खंडारे यांनी जाहीर केली. हिवरखेड, चिखलगाव व शीर्ला या तीन गणांसाठी उमेदवारांची नावे पक्षाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
कुरणखेड जि. प. गटात ‘वंचित’कडून बोर्डे यांना पुन्हा संधी!
जिल्हा परिषद कुरणखेड गटातून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मनीषा बोर्डे यांना वंचित बहुजन आघाडीने पुन्हा संधी दिली आहे. रविवार, ४ जुलै रोजी पक्षाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कुरणखेड जिल्हा परिषद गटासाठी माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी व सुशांत बोर्डे उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक होते. अखेर या गटातून माजी सभापती मनीषा बोर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
जि. प. गटनिहाय राकाँ उमेदवारांची अशी आहे यादी !
दगडपारवा : सुमन गावंडे, कुटासा : छबुताई राऊत, कानशिवणी : किरण मोहोड, बपोरी : संजना कोरडे व तळेगाव जि. प. गटातून अनिता अरबट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजप उमेदवारांची यादी आज होणार जाहीर !
जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या रिक्त २८ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आज, सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
काॅंग्रेस उमेदवारांची यादी आज जाहीर होणार !
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी आज, सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे, असे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी रविवारी सांगितले.