राष्ट्रवादी करणार अकोला पूर्व मतदारसंघावर दावा!
By admin | Published: August 12, 2014 01:00 AM2014-08-12T01:00:12+5:302014-08-12T01:00:12+5:30
राज्यस्तरावर आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसमध्ये सहमती झाली असली तरी, अकोला जिल्हय़ात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दोन विधानसभा जागांवर दावा करणार
अकोला : राज्यस्तरावर आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसमध्ये सहमती झाली असली तरी, अकोला जिल्हय़ात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दोन विधानसभा जागांवर दावा करणार असून, यामध्ये मूर्तिजापूर या राखीव जागेसह अकोला पूर्व मतदारसंघाचा समावेश राहणार आहे. यासाठी जिल्हय़ातील एका ज्येष्ठ नेत्याने शरद पवार यांच्याकडे फिल्डिंग लावली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्हय़ातील वातावरण ढवळून निघाले असून, प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. तसेच वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. अकोला जिल्हय़ातील अकोला पूर्व, पश्चिम, मूर्तिजापूर, बाळापूर,आकोट असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी मूर्तिजापूर मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला आहे. पूर्वी सर्वसाधारण उमेदवारासाठी असलेला हा मतदारसंघ गत विधानसभा निवडणुकीपासून अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतर सर्वसाधारण इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे. त्यामुळे मराठाबहुल असलेल्या अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा आहे. आघाडीचा उमेदवार गत पंचवीस वर्षात या ठिकाणाहून निवडून आला नसल्याचे पवार यांच्या निदर्शनात या ज्येष्ठ नेत्याने आणून दिले आहे. दुसरीकडे काँग्रेसने या मतदारसंघात जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्ये या मतदारसंघातून तिकीट मागणार्यांची यादी मोठी आहे. राष्ट्रवादीकडे सध्या या मतदारसंघातून निवडणूक लढवायला दोघे इच्छुक आहेत. त्यामुळे आघाडीतील ही जागा कोणाला जाते, याकडे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.