राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन मतदारसंघांवर दावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 02:29 PM2019-06-22T14:29:39+5:302019-06-22T14:30:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने बाळापूर व अकोला पश्चिम या दोन मतदारसंघांबाबत आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोला : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येणारी निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करूनच लढण्याचा राष्ट्रवादीचा तूर्तास मानस असून, त्याच दृष्टीने मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. यानुषंगाने शुक्रवारी मुंबईत झालेल्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाळापूर व अकोला पश्चिम या दोन मतदारसंघांबाबत आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, गुलाबराव गावंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी जिल्ह्याचे चित्र मांडले, तर महानगर अध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी यांनी अकोला शहरातील स्थितीची माहिती दिली.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये अकोल्यातील पाचपैकी चार मतदारसंघ काँग्रेसला तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवारी देण्यात आली होती. २०१४ मध्ये आघाडीतील हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे २०१९ साठी जागा वाटपाचा निकष ठरविताना २००९ च्या जागा वाटपाचे सूत्र समोर ठेवत राष्ट्रवादीकाँग्रेसने दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. अकोला पश्चिम हा मुस्लीमबहुल मतदारसंघ असून, येथे गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक दोनवर होता. त्यामुळे हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे कायम ठेवत मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी शहरातील मुस्लीम नेत्यांनी रेटून धरली. दुसरीकडे काँग्रेसकडे असलेला बाळापूर हा मतदारसंघ राष्टÑवादीला मिळावा, असा आग्रह नेत्यांनी धरला. अकोला पश्चिममध्ये राष्ट्रवादीने मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिली, तर त्याचा फायदा बाळापूर या मुस्लीमबहुल मतदारसंघात दुसऱ्या उमेदवाराला होऊ शकतो, असा कयास बांधल्या जात आहे. बाळापुरातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे हेच उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने अकोला पश्चिम आपल्याकडे ठेवून बाळापूरही मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आघाडीच्या संयुक्त बैठकीत कस लागणार आहे. याबैठकीला राष्ट्रवादीचे नेते संतोष कोरपे, श्रीकांत पीसे पाटील, विजय देशमुख, रफीक सिद्दीकी, राजु बोचे, आदी उपस्थित होते.
अकोला पश्चिम केंद्रबिंदू
काँग्रेसला बाळापूर, अकोला पश्चिम व अकोट हे तीन मतदारसंघ हवे असून, राष्ट्रवादीची अकोला पूर्व व मूर्तिजापूर या दोन मतदारसंघांवर बोळवण करण्याची रणनीती आहे. काँग्रेसच्या बैठकीत तशी मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे अकोला पश्चिम या मतदारसंघाबाबत आघाडीत रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात क्रमांक दोनची मते घेणारे राष्ट्रवादीचे विजय देशमुख, रफीक सिद्दीकी, जावेद जकेरिया यांनाही उमेदवारी हवी आहे.