भाजप राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत, माजी आमदारानं घेतली फडणवीसांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:31 AM2022-08-12T10:31:30+5:302022-08-12T10:32:09+5:30
काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर आता हळहळू राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर आता हळहळू राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर अनेकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबाही दिला. एकीकडे अनेक जण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे आता भाजपही सक्रिय झाला आहे. भाजप आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असून बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सिरस्कार यांनी गुरूवारी मुंबईत फडणवीसांची भेट घेतली. आता ते २० ऑगस्ट रोजी अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करतील. एकीकडे शिंदे गटात अनेकांचा प्रवेश होत आहे, तर दुसरीकडे आता भाजपमध्येही इनकमिंग सुरू झालं आहे.
सिरस्कार हे भारिप बहुजन महासंघाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात १० वर्षे आमदार राहिले होते. त्यानतंर त्यांनी २०१९ मध्ये माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता त्यांनी राष्ट्रवादीचीही साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते २० ऑगस्टला भाजपत प्रवेश करतील.