राष्ट्रवादीला गटबाजीची लागण; कार्यकर्ते निपचित!

By admin | Published: May 9, 2017 02:49 AM2017-05-09T02:49:11+5:302017-05-09T02:49:11+5:30

पक्षात बदल केल्याची बाब अनेकांच्या जिव्हारी

NCP gets involved in grouping; Workers Detected! | राष्ट्रवादीला गटबाजीची लागण; कार्यकर्ते निपचित!

राष्ट्रवादीला गटबाजीची लागण; कार्यकर्ते निपचित!

Next

अकोला : राज्य सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचा विषय असो वा तूर खरेदीच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य करत सर्वत्र रान उठवले आहे. ही भूमिका विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने घेणे अपेक्षित असताना अकोल्यात राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीने पोखरल्याचे दिसून येते. राकाँच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा विजय देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर पक्षांतर्गत बदल अनेकांच्या पचनी पडले नसल्याची पक्षात चर्चा आहे. जनहिताच्या मुद्यावर जुन्या जाणत्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी एकत्र येण्याची गरज असताना त्यांनी साधलेल्या चुप्पीमुळे राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालीवर प्रश्नचिन्हं उपस्थित होण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील पाचपैकी तीन नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपच्या विजयी रथाला रोखणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघासह शिवसेनेला अशक्य झाल्याचे दिसून आले.
निवडणुकांमध्ये जय-पराजय होणार, हे निश्‍चित असले, तरी अपयशामुळे खचून न जाता राजकीय पक्षांनी पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे अपेक्षित होते. तूर्तास अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं तसेच काँग्रेसच्या गोटातील निरव शांतता कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे. त्याउलट सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेची भूमिका प्रचंड आक्रमक असल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीवरून भाजप सरकारला जेरीस आणणार्‍या शिवसेनेने तूर खरेदीच्या विषयावर सरकारला लक्ष्य केले. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी तूर खरेदीच्या ठिकाणी धाव घेऊन नाफेडच्या अधिकार्‍यांवर तूर फेकत निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ बाळापूर तालुक्यात शेतकर्‍यांचा रूमणे मोर्चा काढून भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.
सेनेच्या रूमणे मोर्चाची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्हाभरात आंदोलन तीव्र करण्याचा आदेश जिल्हाप्रमुख देशमुख यांना दिला आहे. त्यादिशेने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. सरकारमध्ये सहभागी शिवसेनेने विरोधकांची भूमिका निभावणे पसंत केले असतानाच स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी चुप्पी साधली आहे. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत जिल्हाध्यक्षपदी विजय देशमुख यांची नियुक्ती केली.
आधीच गलितगात्र झालेल्या राकाँतील अनेक आजी-माजी पदाधिकार्‍यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारणे तर दूरच, उलट पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालणे पसंत केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्याचा परिणाम पक्ष बांधणीसह संघटनेवर होत असून, जनहिताच्या कोणत्या मुद्यावर राष्ट्रवादी लढा उभारणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर युती सरकार वारंवार घुमजाव करत आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन उभारणे ही शिवसेनेची ह्यड्रामेबाजीह्ण सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे. येत्या ११ मे रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये पुढील रणनीती ठरवल्या जाईल.
-विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष राकाँ

Web Title: NCP gets involved in grouping; Workers Detected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.