राष्ट्रवादीचे नेते रवी राठी यांचे पित्त खवळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:44+5:302021-02-09T04:21:44+5:30
मूर्तिजापूर : येथील भगवंत लाॅनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेनिमित्ताने सभा घेण्यात आली होती. ...
मूर्तिजापूर : येथील भगवंत लाॅनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेनिमित्ताने सभा घेण्यात आली होती. सभेतच राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रकाशित केले, त्यामुळे राज्याचे संघटन सचिव रवी राठी यांचे पित्त खवळले. त्यांनी प्रसारमाध्यमांनाच खोटे पाडण्याचा प्रयत्न करून अर्वाच्य भाषेत वक्तव्य केले.
८ फेब्रुवारी रोजी रवी राठी यांनी फेसबुक लाइव्ह येऊन असला प्रकार झाला नसल्याचे सांगत थेट प्रसारमाध्यमावरच त्यांची जीभ घसरली. ६ फेब्रुवारी रोजी जयंत पाटील यांच्या समोर शहर अध्यक्ष राम कोरडे हे रवी राठी यांच्याविरुद्ध आक्रमक झाले होते. मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर ४१ हजार मते मिळविल्याचे सांगताच राम कोरडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर राठी यांनी क्षणात पाणी फेरल्याने संतप्त झालेल्या राम कोरडे यांनी यावर मला बोलायचे आहे, असे जयंत पाटील यांना सांगताच त्यांनी राम कोरडे यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर कांबे यांनीही जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीतील धुसफूस व गटबाजी चव्हाट्यावर आली. झाल्या प्रकाराचे विस्तृत विश्लेषण प्रसारमाध्यमांनी मांडले. यामुळे रवी राठी यांचे पित्त खवळले. त्यांनी फेसबुक लाइव्ह येऊन झाला प्रकार दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी पत्रकारांचे उट्टे-उणे काढून चिरीमिरीच्या पत्रकारांनी न घडलेला प्रकार प्रसिद्ध केल्याचे म्हटले आहे. वास्तविक शेकडो उपस्थितांसमोर घडलेला सत्य प्रकार प्रसारमाध्यमांनी वाचकांसमोर आणला. प्रसारमाध्यमावर चिडलेल्या रवी राठींना अनेक नेत्यांच्या व जनसमुदायासमोर घडलेला प्रकार पचनी पडला नसल्याने त्यांची चिडचिड वाढली आहे. उपस्थित जनसमुदायाला व पत्रकारांना खोटारडे ठरविण्याचा प्रकार या माध्यमातून केल्याने ते जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचे स्पष्ट होते. या संदर्भात रवी राठी यांनी प्रसारमाध्यमांची माफी मागावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.