राष्ट्रवादीचे कॅप्टन शरद पवार बारावा गडी : मुख्यमंत्र्यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:09 PM2019-04-16T12:09:24+5:302019-04-16T12:09:33+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवित सैन्याच्या कारवाईचा उदो-उदो केला
चिखली/ तेल्हारा : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पराभूत मानसिकतेच्या नेत्यांचा पक्ष असून, या पक्षाच्या कॅप्टनने खेळण्यापूर्वीच मी बॅटींग करणार नाही आणि बारावा गडी असल्याचे जाहीर केले, अशा शब्दात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याच परिवाराची गरिबी हटली, असा घणाघाती आरोप केला.
अकोल्यातील भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ तेल्हारा व बुलडाण्यातील शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी चिखली येथे आयोजित सभेत त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवित सैन्याच्या कारवाईचा उदो-उदो केला. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश व देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी मोदींनी एअर स्ट्राइक केले व देशाचा आत्मसन्मान वाढविला, त्यामुळे मोदी हेच सक्षम पर्याय आहेत. मोदींच्या नेतृत्वामुळे देश कमजोर नाही, हे लोक आता मानायला लागल्याचे सांगत काँग्रेसचे नेते एअर स्ट्राइकचा पुरावा द्या, पुरावा द्या करत गोंधळ घालत आहेत. हे जर आधी माहीत असते तर आम्ही त्यावेळी एखाद्या मिसाईला तुम्हालाच बांधून पाठवले असते, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी यांनी आणलेली ‘गरिबी हटाव’ या योजनेची खिल्ली उडविली. त्यांच्या पाच पिढ्यांकडून गरिबी हटली नाही, याउलट ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा देऊन त्यांनी स्वत:चीच घरे भरली, असा घणाघाती आरोप केला. यावेळी भाजपा सरकारच्या काळातील विविध योजनांचे दाखले देत विकासाच्या मुद्यावरही विरोधकांना टीका करण्याची संधी नसल्याचे स्पष्ट केले.
-तर शेतकऱ्यांना पेन्शन देणारा भारत हा पहिला देश
पुन्हा सत्ता मिळाल्यास वयाची ६० वर्षे पूर्ण करणाºया शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. शेतकºयांना पेन्शन सुरू करणारा भारत हा पहिला देश राहील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.