नेकलेस रस्त्याचे होणार रुंदीकरण; मनपाने केले मार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:38 PM2018-12-15T13:38:50+5:302018-12-15T13:40:23+5:30
अकोला: बहुप्रतीक्षित नेकलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रांरभ केला जाणार असून, महापालिकेच्या नगररचना विभागाने मार्किंगद्वारे रस्त्याचा मध्यबिंदू (सेंटर पॉइंट) निश्चित केला.
अकोला: बहुप्रतीक्षित नेकलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रांरभ केला जाणार असून, महापालिकेच्या नगररचना विभागाने मार्किंगद्वारे रस्त्याचा मध्यबिंदू (सेंटर पॉइंट) निश्चित केला. रस्त्यालगतचे वृक्ष हटविण्याचे काम मनपाच्या स्तरावर पूर्ण केले जाणार आहे. विजेचे खांब, रोहित्र हटवून भूमिगत वीज वाहिनीसाठी महावितरण कंपनीने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून निधीचा ओघ सुरूच आहे. प्राप्त निधीतून शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच एलईडी पथदिव्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, धिंग्रा चौक ते सिटी कोतवाली ते थेट किल्ला चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगिचा, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉटपर्यंत मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नेहरू पार्क ते थेट संत तुकाराम चौकापर्यंत होणाºया गोरक्षण रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच धर्तीवर आता सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणाºया मालमत्तांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा प्रशासन सक्रिय झाले आहे. शुक्रवारी सकाळी नगररचना विभागातील संदीप गावंडे व त्यांच्या चमूने विकास आराखड्यानुसार रस्त्याचे मोजमाप करून ‘सेंटर’ निश्चित केले. त्यावेळी नगरसेवक आशिष पवित्रकार व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
भूमिगत वीज वाहिनीचे काम महावितरणकडे!
सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट ते दुर्गा चौकापर्यंत १२०० मीटर अंतरावरील रस्त्यालगतचे विद्युत खांब, रोहित्र हटवून भूमिगत वीज वाहिनीचे जाळे टाकल्या जाणार आहे. सदर काम महावितरण कंपनीकडे सोपविण्यात आले असून, यावर ३ कोटी १४ लाख रुपये खर्च होतील. या कामासाठी तब्बल सात टक्के जादा दराने निविदा मंजूर करण्यात आली, हे येथे उल्लेखनीय.
रस्त्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार
सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्राप्त २५ कोटींच्या निधीतून तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम मंजूर करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रकाशित केली असता ओबेरॉय नामक कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
१५ मीटर रुंद रस्त्यावर ‘एलईडी’चा झगमगाट
सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंत ८२२ मीटर अंतरापर्यंत १५ मीटर रुंद असा प्रशस्त सिमेंट रस्ता तयार होणार आहे. त्यावर लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे लावल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रतनलाल प्लॉट ते दुर्गा चौकापर्यंत रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला जाईल.
नेकलेस रस्त्याची तातडीने मार्किंग करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. रस्त्यालगतचे वृक्ष हटविण्यासाठी शहर अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. वृक्ष हटविल्यानंतर विद्युत पोल हटविल्या जातील. त्यानंतर रस्ता रुंदीकरणाला प्रारंभ होईल.
-विजय अग्रवाल, महापौर.