जीवघेण्या व्यसनाविरुद्ध जनजागृती आवश्यक - चव्हाण
By admin | Published: June 1, 2015 02:30 AM2015-06-01T02:30:58+5:302015-06-01T02:30:58+5:30
तंबाखू मुक्ती दिन रॅलीत १५0 एन.सी.सी. कॅडेट्सचा सहभाग.
अकोला : केवळ विरंगुळा म्हणून लहान मुलांमध्ये तंबाखू व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परिणामी या जीवघेण्या व्यसनामुळे उद्याच्या पिढीचे आरोग्य धोक्यात आहे. या जीवघेण्या व्यसनाविरोधी सर्वच स्तरावर जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कर्नल अजित चव्हाण यांनी केले.
११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन अकोलाच्या वतीने रविवार, ३१ मे रोजी ह्यतंबाखूविरोधी दिवसाह्णनिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. ही रॅली सकाळी ९ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन कार्यालयातून निघाली. येथून ही रॅली खदान पोलीस स्टेशन व नंतर सिंधी कॅम्पस्थित गुरुनानक विद्यालय येथे पोहोचली. येथे पोहोचल्यावर एन.सी.सी. कॅडेटला संबोधित करताना ते बोलत होते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मुत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढत आहे. लोकांना अशा पदार्थांच्या सेवनापासून परावृत्त करून त्यांच्यात जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी कर्नल अजित चव्हाण यांनी केले. एन.सी.सी. कार्यालय ते रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन मार्गे रॅली काढण्यात आली. परंतु, काही कारणास्तव या रॅलीचा मार्ग बदलण्यात आला. तंबाखूविरोधी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील १५0 एन.सी.सी. कॅडेट सहभागी झाले होते.
*एन.सी.सी. कॅडेट करणार जनजागृती
तंबाखूविरोधी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान कर्नल अजित चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे शाळा, महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट सर्वच स्तरावर ह्यतंबाखूमुक्तीह्णबाबत जनजागृती करणार आहे. या जनजागृती अभियानाची सुरुवात एन.सी.सी. कॅडेट हे स्वत:च्या कुटुंबापासून करणार आहेत. या नंतर परिसरातील नागरिक, मित्र, नातेवाईकांमध्ये अशाप्रकारे या विशेष जनजागृती अभियानाला प्रारंभ होणार आहे. तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.