वसुंधरा वाचविण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज - प्रा. एच. एम. देसरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:31 AM2018-01-11T01:31:07+5:302018-01-11T01:32:23+5:30
अकोला : वसुंधरेला पर्यायानेच मानवतेला व शेतकर्याला वाचविण्यासाठी ‘समता मुलक शाश्वत विकास मार्ग’ स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करावा लागेल व निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला. जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा स्रोत विकसित केले तरच वसुंधरेचा व मानवतेचा बचाव करता येईल, असा आशावाद प्रख्यात अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्थानिक शिवाजी महाविद्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. प्रा. देसरडा म्हणाले, की वसुंधरेच्या रक्षणाची आर्त हाक ऐकण्याची गरज आहे. कर्ब व अन्य विषारी वायूच्या बेसुमार उत्सर्जनामुळे तापमान वाढीची जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत जगातील १८४ देशांच्या १५३६१ शास्त्रज्ञांनी हवामान बदलाच्या धोक्याचा इशारा दिला आहे. हा धोका जैवविविधतेचा लोप करणार आहे. यावर वेळीच इलाज केला नाही, तर मानवाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनीच दिला आहे. त्यामुळेच या संकटाच्या विरोधात तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वसुंधरा बचाव, मानव बचाव, किसान बचाव अशा प्रबोधन संवाद यात्रेला ६ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यवतमाळ येथून प्रारंभ झाल्यानंतर ही यात्रा विदर्भातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले.
येणार्या काळात सौर उर्जेचा वापर वाढविण्याची गरज असून, ही ऊर्जा शाश्वत आणि हवामान बदलाच्या संकटांवर मात करणारी ठरेल. त्यामुळेच कोळशापेक्षाही स्वस्त पडणारी ही ऊर्जा सर्वत्र स्वीकारली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.