परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला चालना देण्याची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:08+5:302021-07-14T04:22:08+5:30
अकोला : ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकविलेला सेंद्रीय व आहारमूल्य ...
अकोला : ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकविलेला सेंद्रीय व आहारमूल्य असलेला भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार असून, परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला अधिकाधिक चालना देण्याची गरज आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी सोमवारी व्यक्त केले.
‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे निर्मित जिल्हास्तरीय पोषण परसबागेला भेट दिली असता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक गजानन महल्ले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुरज गोहाड, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ कीर्ती देशमुख उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात १५ जून ते १५ जुलै २०२१ या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांनी परसबागेचे महत्त्व समजावून सांगितले.
कोरोनाकाळातही जिल्ह्यात
४१०० परसबागांची निर्मिती !
जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी ४१०० परस बागांची निर्मिती केली आहे. उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत आहार पोषण व स्वच्छताविषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, ६ ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकवलेला ताजा भाजीपाला व फळे इत्यादींचा समावेश व्हावा याकरिता उमेद अभियान प्रयत्न करत आहे.
......................फोटो.............