जग जिंकण्यासाठी हवे मदतीचे पाठबळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:13 PM2020-01-25T12:13:47+5:302020-01-25T12:28:36+5:30
अमेरिकेला जाण्यासाठी या मुलींकडे पैसा नाही; परंतु जग जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना या मुलींना सहृदयी समाजाबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या मदतीचे पाठबळ हवे आहे.
अकोला: शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलींना इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना लाजवेल, असा रोबोट बनवून अमेरिकेतील डेटरॉइट येथील वर्ल्ड फेस्टिव्हलपर्यंत झेप घेतली आहे. कधी रेल्वेने प्रवास न केलेल्या मनूताई कन्या शाळेच्या १४ विद्यार्थिनींची अमेरिकेत जाण्यासाठी निवड झाली खरी; परंतु त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेला जाण्यासाठी या मुलींकडे पैसा नाही; परंतु जग जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना या मुलींना सहृदयी समाजाबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या मदतीचे पाठबळ हवे आहे.
मुंबई येथील राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेतील चार फेऱ्यांमध्ये देशभरातून आलेल्या २00 चमूंवर मात करीत मनूताई कन्या शाळेच्या १४ मुलींनी एक नव्हे, तर तब्बल तीन पुरस्कार पटकावले. या मुलींची अमेरिकेतील वर्ल्ड फेस्टिव्हलसाठी निवड झाली. शुक्रवारी विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक, रोबोटिक्स तज्ज्ञ काजल राजवैद्य, पर्यवेक्षक अजय मलिये, विजय भट्टड यांच्यासह लोकमत कार्यालयात भेट दिली. यावेळी ‘लोकमत’च्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या मुलींची कौटुंबिक पृष्ठभूमी जाणून घेण्यात आली. कौटुंबिक परिस्थितीविषयी बोलताना, मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक यांनी या मुलींनी अथक परिश्रमातून रोबोट बनविला. कधी रेल्वेत न बसलेल्या विद्यार्थिनींची अमेरिकेसाठी निवड झाली; परंतु अमेरिकेला जाण्याइतपत या विद्यार्थिनींची आर्थिक परिस्थिती नाही. या सर्व मुली ग्रामीण भागातील असून, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील आहेत. त्यामुळे सहृदयी समाजाने, जिल्हा प्रशासनाने या विद्यार्थिनींना अमेरिकेत पाठविण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले. समाजाने आर्थिक पाठबळ दिले, तरच या विद्यार्थिनी अमेरिकेला जग जिंकण्यासाठी जाऊ शकतील आणि अकोल्याचे नाव उंचावतील.
छाया:
‘लोकमत’कडून विद्यार्थिनींचे कौतुक
अमेरिकेतील डेटरॉइट येथील वर्ल्ड फेस्टिव्हलसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींचे कौतुक करीत ‘लोकमत’चे निवासी संपादक रवी टाले यांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले आणि त्यांना अमेरिका दौºयासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबईसाठी या संस्थांनी केली मदत
मुंबई येथील फर्स्ट लिगो लीगसाठी या विद्यार्थिनींना रोटरी क्लब अकोला पूर्व, लायन्स क्लब, आर फॅक्टर, एफआरसी ६0२४, एफजीसी मुंबई, अक्षरा वाचन ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संघ, मनूताई कन्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी वृषभ राजवैद्य, चिन्मय दामले, शिल्पा राजवैद्य, रामकृष्ण रॉकर्स, लेडिज होमक्लास सोसायटीच्या अध्यक्ष सुमंगला थत्ते, अर्जुन देवरणकर, पल्लवी करमकर, शर्वरी धारस्कर व मैथिली पाठक यांनी आर्थिक मदत केली.