शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज
By admin | Published: December 29, 2014 01:46 AM2014-12-29T01:46:01+5:302014-12-29T01:46:01+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात बच्चू कडू यांचे प्रतिपादन.
अकोला : निसर्गाच्या कोपामुळे आणि मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशीच राहण्याची पाळी आली आहे. घर, दार, शेती विकूनदेखील कष्टात जीवन जगणारे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. समाज आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून या अन्नदात्याला वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात रविवारी दुपारी पार पडलेल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले की, समाजजागृतीकरिता कीर्तन, भजन, मेळावे, महोत्सव तर व्हायलाच हवेत, मात्र स्वत:चा देह झिजवून तुम्हा-आम्हा सर्वांचे पोट भरण्यासाठी हाडाची काडं करणार्या शेतकर्यांच्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. परिस्थितीने हतबल झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहेत. त्यांचे मतपरिवर्तन करण्याची खरी गरज असल्याने, ग्रामगीतेच्या माध्यमातून ती प्रत्येक गावात पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गुरुदेवभक्तांना केले. केवळ शासकीय योजना व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामूहिक प्रयत्नांची जोड देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. युवा महोत्सवात कपिल ढोक यांनी राष्ट्रसंतांना अपेक्षित भारताची संकल्पना विषद केली आणि बुवाबाजी करून संत म्हणवू घेणार्यांवर परखड ताशेरे ओढले. बुलडाण्याचे दीपक महाराज साबळे यांनी राष्ट्रसंतांचे विचार घरोघरी पोहचविण्यासठी असे कार्यक्रम गावागावांत घेतल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.